कडाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कडावमध्ये कुणीतरी व्यक्तीने खुराकात फॉरेट हे जालिम विष घालून अमानुषपणे कडाव, गणेगाव आणि सालवडमधील दहा पेक्षा अधिक गायींचा दुर्दैवी मृत्यू घडवून आणल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर, या मृत पावलेल्या काही गायी जमिनीत पुरल्या तर, दुर्गंधीयुक्त वातावरणाने परीसरात रोगराई पसरली जाऊन आरोग्य विषयक गंभीर समस्या उभी राहू शकते. त्यामुळे ती रोगराई आटोक्यात आणण्यासाठी त्या मृत गायींना खड्डा खणून जमिनीत पुरल्यास
आरोग्याचा प्रश्न उभा राहणार नाही.
कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील गणेगाव, चांधई मार्गालगत असणार्या क्रिकेटच्या मैदानावर एका साईटला कुणीतरी व्यक्तीने खुराकात मोठ्या प्रमाणात फॉरेट सदृश्य विष घातले असे बोलले जात होते. त्यामुळे कडाव व परीसरातील मोकाट असणार्या गायींनी हे विष मिश्रीत खुराक खाल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कडावमधील सात ते आठ, गणेगाव व सालवडमधील तीन-चार अशा दहा पेक्षा अधिक गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मोकाट गुरांवर नेमका विषप्रयोग कुणी, कधी व का केला याबद्दल तर्कवितर्क लावले जात असून ग्रामस्थ व गायी मालक अशा व्यक्तीच्या शोधात असून त्यावर कठोर कारवाई व्हावी असे सर्वसामान्य नागरिकांकडूनही
बोलले जात आहे.
यासंदर्भात कडावमधील काही ग्रामस्थांनी तालुका पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशमुख यांच्याकडे चर्चा केली असता पशुसंवर्धन विभागाचे डॉ. लाड आणि डॉ. कसबे यांनी घटनस्थळी येऊन पाहणी केली असता गायींना विषबाधा झाल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर या मृत गायींना खड्डा खणून पुरुन टाका अशा सुचना पोलिस पाटील व ग्रामस्थांना केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसात कडाव व परीसरातील अनेक गायी विषबाधेने मृत झालेल्या आहेत. कर्जतमधील कडावमध्ये घडलेला हा प्रकार माणूसकीला काळीमा फासणारा आहे. मुक्या जनावरांवर विषप्रयोग करणे हे कृत्य अत्यंत क्रूरतेचे लक्षण आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काम करणार्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
– महेश हाडप, सामाजिक कार्यकर्ता, गणेगाव चिंचवली