कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्याची धूप, लाटांच्या मार्यामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याची. समुद्रकिनारा या पर्यटनवृध्दी होणार्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष न दिल्यास भविष्यात हा किनारा उद्ध्वस्त होऊन पर्यटनस्थळाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
मुरूडमध्ये दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. ही संख्या नजीकच्या वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे, तथापि रस्ते व किनारा सुशोभिकरण, वाहनतळ आदी मूलभूत सुविधा देण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. मुरूड नगरपरिषदेनेही प्राधान्याने हा विषय लावून धरला आहे.
मुरूड समुद्र किनार्यावरील जिल्हा परिषद विश्रामगृह ते विश्रामबागेपर्यंतचा दगडी बांध नावापुरताच उरला असून पावसाळी लाटांच्या मार्यात सुरूची अनेक झाडे उन्मळून पडली असून ही झाडे संवर्धनासाठी गेल्या 10-15 वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. सामाजिक वनीकरणाच्या 1980 सालच्या योजनेतून सुरूची झाडांची लागवड केली होती. आजच्या घडीला पर्यटकांसाठी सुरूचे बन हे आकर्षण ठरू पाहत असले तरी योग्य पध्दतीने वृक्षांचे संवर्धन झाले नाही. मेरीटाइम बोर्डानेही धूप प्रतिबंधक बंधार्याकडे फारसे लक्ष न दिल्याने मुरूडच्या किनार्याची स्थिती दयनीय आहे.
मुरूडच्या किनार्यावर धूप प्रतिबंधक दगडी बंधारा बांधून उर्वरित सुरूच्या झाडांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी शासनाने या पर्यटनस्थळाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
गेल्या 13 वर्षापूर्वी समुद्रकिनारी सुरूच्या बनात नाना-नानी पार्क व लहान मुलांसाठी मिनीट्रेनचे रूळही बसवले होते. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी स्टॉलही बांधण्याचा प्रयत्न होता, परंतु निधीअभावी आणि किनारपट्टी सागरी नियमन (सीआरझेड) कायद्याच्या कचाट्यात हे काम सापडल्याने हा प्रकल्पही बारगळला.
यासंदर्भात मुरूड नगर परिषदेचे नियोजन व पर्यटन समिती सभापती पी. के. आरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही पाठपुरावा करीत असून किनारा सुशोभिकरणाचा 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव 16 एप्रिल 2018 रोजी सादर केला आहे. पर्यटन मंत्रालयातही दोनदा भेट देऊन या विषयासाठी संपर्क केला आहे, तसेच पालकमंत्र्यांनीही शिफारस केली आहे. निधी प्राप्त होताच किनारा सुशोभिकरण करणार असून पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा मुरूड नगर परिषदेचा प्रयत्न असल्याचे आरेकर यांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार म्हणाल्या की, मुरूडचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ मुरूडला वाढू शकतो. अलिबागच्या धर्तीवर किनारा सुशोभिकरण करायला हवे. तसेच एकदरा ब्रिजच्या दक्षिणेस दोन्ही बाजूंनी किनार्यावर संरक्षक भिंत बांधल्यास गोव्याच्या मांडवी बीचप्रमाणे बॅकवॉटरवर बोटिंग व्यवसायही चांगल्या प्रकारे विकसित होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते.
-संजय करडे