मोहोपाडा : प्रतिनिधी
कोकणवासीयांच्या सामाजिक विकासासाठी सन 1999 मध्ये स्थापन झालेल्या कोकण कट्टा या संस्थेचा 23 वा वर्धापन नुकताच झाला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या सहा मान्यवरांना कोकण रत्न 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रसायनीनजीकच्या कर्नाळा बांधनवाडी येथील ग्रामसंवर्धन संस्थेसोबत काम करत येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम कोकण कट्टा करीत आहे. यावर्षी कोकत कट्टाच्यावतीने आरोग्य सेवा डॉ. बाळासाहेब ढेरे (पालशेत गुहागर) सामाजिक क्षेत्र जीवन आनंद संस्थेचे संदीप परब (पणदूर कुडाळ), कलावंत अनिल गवस, यशस्वी उद्योजक दीपक नाईक आणि विक्रमी रक्तदाता सुरेश रेवणकर यांना पुरस्कार देण्यात आला. ख्यातनाम गायक सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, कलावंत संदीप चोणकर, माजी आमदार गुरुनाथ देसाई, सेवाई संस्था मार्गदर्शक संदीप दळवी. स्वामी समर्थ हडपिड मठाचे विश्वस्त नंदकुमार पेडणेकर व सुरश्री संगीत केंद्राचे सर्वेसर्वा अनिल देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे व निवेदक समर्थ म्हात्रे आणि कोकणकट्टा सदस्य यांनी कोकण कट्ट्याचा प्रवास मांडला. या वेळी श्री स्वामी समर्थ विलेपार्ले मठ, सेवाई संस्था, मुंबईचा पेशवा, स्वामी हडपिड मठ, वात्सल्य ट्रस्ट, ग्राम संवर्धन, वंकास डहाणू ग्रामस्थ, नाना शंकरशेट प्रतिष्ठान, वीर सावरकर सेवा केंद्र, पारले वेल्फेअर आणि तमाम पार्लेकर यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सुरश्री संगीत शिक्षण संस्थेच्या सर्व सदस्यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम केला. सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अजित पितळे, सचिव सुनील वनकुंद्रे, दादा गावडे, खजिनदार सुजीत कदम, विवेक वैद्य, हर्षल धराधर, आत्माराम डीके, प्रथमेश पवार आदींनी मेहनत घेतली.