अलिबाग तालुका भाजपची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्यावर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे पाडण्यासंदर्भात रायगड जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. संबंधितांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. या कारवाईतून स्थानिकांची जुनी घरे, कॉटेजेस् वगळण्यात यावीत, अशी मागणी अलिबाग तालुका भाजप कमिटीतर्फे करण्यात आली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, तसेच महसूल तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष सुनील दामले, पंचायत समिती सदस्य उदय काठे, जिल्हा चिटणिस सतीश लेले, प्रसाद आठवले, शौकीन राणे, अमेय आठवले, सौरभ आपटे, अरविंद पाटील, समीर घरत, चिन्मय फडके आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
अलिबाग तालुक्यातील भूमिपुत्रांनी 40 ते 50 वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. त्यांना कारवाईची नोटीस बाजवण्यात आली आहे, मात्र ज्यांनी दोन वर्षांपूर्वी दोन-चार गुंठे जागा खरेदी करून 25 खोल्यांची कॉटेजेस् बांधली आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तक्रारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उलट त्यांना मदत केली जाते, असे या निवेदनात म्हटले आहे.
स्थानिकांची घर व कॉटेजेस् नियमित व्हावीत यासाठी आम्ही शासनकडे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे ती तोडून त्यांची रोजीरोटी हिरावून घेऊ नये, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.