Breaking News

अवकाळी पावसाने मच्छर वाढू नये म्हणून मनपा कर्मचारी कार्यरत

नवी मुंबई : प्रतिनिधी

नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी सचण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नैसर्गिकरीत्या मच्छरांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी डास उत्पत्ती ठिकाणे शोधून मच्छरांची पैदास होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत, तर स्पीकरद्वारे जनजागृती करून नागरिकांना आवाहन देखील करत आहेत, परंतु अवकाळी पावसामुळे आरोग्य कर्मचार्‍यांचे काम मात्र वाढले आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला मनपात असलेल्या 19 नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी घरोघरी फिरून डेंग्यू, मलेरिया डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करत असतात, तसेच सूचना देऊन फवारणी देखील करतात, परंतु आताच्या अवकाळी पावसामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना दोनदा काम करण्याची पाळी आली आहे.

पावसामुळे घरावर असणार्‍या टायर, शहाळे व इतर साहित्यामध्ये पाणी साचून डेंग्यूचे मच्छर तयार होऊन नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर घराच्या आजूबाजूला असणार्‍या खड्ड्यात सुद्धा पाणी साचून मलेरिया, तापाचे मच्छर निर्माण होण्याची दाट शक्यता असते.त्यावर प्रतिबंध आणला नाही तर तापाच्या आजाराची साथ येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पावसाळ्याच्या आधीच नागरिकांना जागृत करून व खड्ड्यात औषध टाकून, फवारणी करून मच्छरांची पैदास नष्ट करत असतात.

आतासुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यामध्ये जशी परिस्थिती असते.तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छरांची पैदास होऊ नये व तापाची साथ येऊ नये म्हणून आरोग्य कर्मचारी पुन्हा एकदा घरातील पिंप, फ्रीज, झाडाच्या कुंड्या, वातानुकूलित यंत्रणा, घरावरील असलेले साहित्य, टायर, रिकामे शहाळे, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, घरातील छोट्या पाण्याच्या टाक्याची पाहणी करून मच्छरांची पैदास झाली आहे का हे पाहत आहेत, तसेच छोट्या स्पीकर यंत्रणेद्वारे देखील नागरिकांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply