पनवेल : वार्ताहर
आपल्या पतीचा खून करून प्रेमीसह दोन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन पनवेल येथे लपून राहण्यासाठी आलेल्या केरळ राज्यातील प्रेमीयुगुलाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघांपैकी महिलेची प्रकृती थोड्याफार प्रमाणात सुधारत आहे, तर तिचा प्रेमी अद्यापही धोक्याच्या क्षेत्रात असल्याची माहिती समजते.
केरळ राज्यातील मशरूम हार्ट फार्म संतापूर येथे मॅनेजरचे काम करणारा इसम वाशीम अब्दुल कादिर (35, रा. खुज्जी कन्न्डाथील हाऊस वल्लीवथ्थम त्रिसुर, केरला) याचे त्या ठिकाणी काम करणारी लिजी कुरियन (29, रा. रिजोश मुल्लूर, पुथडी संतापूरा, युडडुकी, केरला) हिच्याबरोबर प्रेमसंबंध जुळले. या वेळी त्यांनी प्रेमसंबंधातून लिजी कुरियन हिचे पती रिजोश याचा खून केला व ते पळून मुंबईला आले होते. या संदर्भात तेथील पोलीस ठाण्यात नवरा हरविल्याची तक्रार तिने दाखल केली होती, परंतु या गुन्ह्यासंदर्भात तेथील पोलीस उपनिरीक्षक विनोद कुमार व जॉनी थॉमस यांनी सखोल तपास सुरू केला होता. त्यामुळे या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघे जण दोन वर्षीय मुलीसह पनवेल येथील समीर लॉजिंग व बोर्डिंगमध्ये राहण्यास आले होते.
लिजी कुरियन हिच्या भावाने ती हरविल्याची तक्रार संतापूर पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यानच्या काळात वाशीम अब्दुल कादिर याच्या भावास अटक केली असल्याने व त्याचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे केरळ पोलिसांना समजले होते. ही बाब या दोघांना समजताच त्या घटनेतून त्यांनी विष प्राशन केले असल्याचा अंदाज पनवेल शहर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या घटनेत सदर 2 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्या दोघांपैकी लिजी कुरियनच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, तसेच वाशिम अब्दुल कादिर याच्या प्रकृतीला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दोघांवर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेेत. या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेेत.