पनवेल : रामप्रहर वृत्त
धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता आणि लवकर बरे होण्यासाठी म्युझिक थेरपीसारखे पर्यायी उपचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरच्या उद्घाटनावेळी केले. लायन्स सरगम क्लबने आरोग्य आणि शांततेच्या दिशेने उचललेल्या महत्त्वाकांक्षी लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाले.
या वेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल परमेश्वरन, प्रथम प्रांतपाल संजीव सुर्यवंशी यांच्यासह डिस्ट्रिक्टमधील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सरगम क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर मानदा पंडित यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे गरजूंना आता संगीतोपचाराचा लाभ घेता येणार आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात, औषधोपचार महत्त्वाचे असले तरी, लवकर बरे होण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी म्युझिक थेरपीसारखे पर्यायी उपचार अत्यंत आवश्यक आहेत. सरगम लायन्स क्लबने मोफत म्युझिक थेरपी उपलब्ध करून देऊन एक उदात्त कार्य हाती घेतले आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन.
प्रमुख पाहुणे प्रांतपाल एन. आर. परमेश्वरन आणि प्रथम प्रांतपाल संजीव सुर्यवंशी यांनीही केवळ दोन वर्षांच्या कालावधीत सरगम क्लबने केलेल्या विविध सामाजिक कार्यांचे कौतुक केले आणि या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान, आदित्य दोशी यांनी संगीतोपचाराचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामुळे उपस्थितांना या उपचार पद्धतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संजय गोडसे यांनी केले, तर आभार प्रेमेंद्र बहिरा यांनी मानले. लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरमध्ये दर गुरुवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत दिव्यम ज्योती होलिस्टिक सेंटर, 502, श्री गणेश अपार्टमेंट, सुश्रुषा रुग्णालयासमोर, संगीतोपचार सेवा पुरवली जाणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या उद्घाटन सोहळ्याला रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, झोन चेअरमन अल्केश शहा, सचिव प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, डॉ. आदित्य दोशी, ओंकार खेडकर, अश्विनी खेडकर, सुषमा पन्हाळे, महेंद्र लोहार, प्रदीप भट्टाचार्य यांच्यासह डिस्ट्रिक्टमधील अनेक पदाधिकारी आणि पनवेल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper