मोहोपाडा : वार्ताहर
डॉ. पारनेरकर महाराज महाविद्यालय वाशिवली येथे बारावी विद्यार्थ्यांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज, धामणी येथील प्राचार्य व लेखक डॉ. बी. आर. पाटील व प्रा. हनुमंत मावकर मार्गदर्शक म्हणून लाभले होते. बारावीनंतर महाराष्ट्र तांत्रिक बोर्डकडून औषधनिर्माण शास्त्र व अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी सीईटी व वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
या परीक्षेसंदर्भात व अभ्यासक्रमाबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती डॉ. बी. आर. पाटील यांनी दिली. बोर्ड परीक्षेत यश संपादन करायचे असेल, तर नियोजनबद्ध अभ्यास करून ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत प्राचार्य रमेश शिमरे यांनी व्यक्त केले. या वेळी प्रा. बी. बी. जावळे, संगणकतज्ज्ञ राज पाटील व एम. ए. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. ए. आर. पाटील यांनी केले व आभार प्रा. एम. वाय. सोनावणे यांनी मानले.