उरण : रामप्रहर वृत्त
उरण शहरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विश्वकर्मा जंयती आदी विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी गणेशमूर्ती, देवीच्या मूर्तीचे खूप मोठ्या प्रमाणात उरण शहरातील विमला तलावात विसर्जन केले जाते. शिवाय अधून मधून विविध सण धार्मिक कार्यप्रसंगी विमला तलावात विविध मूर्तींचे विसर्जन केले जाते. शिवाय मूर्तीसोबत असलेले विविध हार, फुले आदी सामानही पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे विमला तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण खराब होत चालले आहे. उरण नगर परिषदेकडून विमला तलावात, गार्डन परिसरात नेहमी स्वच्छता ठेवली जाते. नगर परिषदेकडून स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली जाते. नगर परिषदेचे कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावितात, मात्र विविध धार्मिक सण, कार्यक्रमप्रसंगी विमला तलावात मूर्तीचे व निर्माल्याचे जनतेकडून, भाविक भक्तांकडून विसर्जन केले जाते. यामुळे नगर परिषद कर्मचार्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
मोठमोठ्या मूर्ती व कचरा पाण्यातून बाहेर काढताना जीव धोक्यात घालून कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी विमला तलावातील सर्व मासे मृत स्वरूपात आढळले होते. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये व तलाव नेहमी स्वच्छ राहावा यासाठी जनतेने विमला तलावात मोठमोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता लहान लहान मूर्तीचे विसर्जन करावे, कोणत्याही प्रकारची हार फुले आदी केमिकलयुक्त सामान, वस्तू पाण्यात टाकू नये, विविध रासायनिक पदार्थांनी बनविलेल्या मूर्तीऐवजी पाण्यात लगेच विरघळणार्या व पाण्याला कोणतीही हानी न पोहोचविणार्या अशा मूर्तीचेच पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी उरण तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी संघटना करीत आहेत.