दुसर्या दिवसअखेर भारत 6 बाद 493 धावा
इंदूर : वृत्तसंस्था
मयांक अग्रवालच्या धडाकेबाज द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवसअखेर 6 बाद 493 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्या दिवशी 1 बाद 86 या धावसंख्येवरून शुक्रवारी (दि. 15) भारताने डावाला सुरुवात केली होती. मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने 343 धावांची आघाडी घेतली आहे.
दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली, पण त्यानंतर पुजारा 54 धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. मग रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. रहाणे 86 धावांवर बाद झाला, परंतु अग्रवालने दमदार द्विशतक ठोकले. द्विशतकानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात तो 243 धावांवर बाद झाला.
मयांक बाद झाल्यावर जडेजाने तुफान फटकेबाजी केली. सध्या जडेजा 60, तर उमेश यादव 25 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला होता. बांगलादेशकडून अबू जायेदने चार, तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.