Breaking News

दिबां’च्या नावासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार -अॅड. मनोज भुजबळ

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार असल्याची ग्वाही दिली आहे.

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी ‘दिबां’च्या नावासाठी देण्यासाठी आम्ही पराकोटीचे प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले. आपल्या भूमिकेचे विश्लेषण करत असता मनोज भुजबळ म्हणाले की, आज एक नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक वकील अथवा वकीलांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका मांडत नाही तर एक त्रयस्थ, एक सामान्य नागरिक म्हणून मला असे वाटते की, नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देणे संयुक्तिक होईल. हिंदुहृदयसम्राट हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांची संपूर्ण हयात त्यांनी मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी संघर्ष उभारण्यात, झटण्यात घालविले आहे. परंतु तरी सुद्धा नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देणे संयुक्तिक होणार नाही कारण आज तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये त्यांचे भव्यदिव्य असे स्मारक उभारले जात आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आजपर्यंत आमचे माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे अशाप्रकारे स्मारक उभारण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. दि. बा. पाटील यांनी कामगारांसाठी शेतकर्‍यांसाठी निस्पृहपणाने कार्य करत आंदोलने उभारली, त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून दिले. त्यामुळे नवी मुंबई वमानतळासाठी दि. बा. पाटील यांचेच नाव देणे उचित होईल.

भुजबळ पुढे म्हणाले की, मी माझ्या लहानपणापासून पाटील यांचे कार्य पाहत आलो आहे. निस्वार्थी पणाने झोकून देऊन कार्य करणारे नेते असाच त्यांचा मी उल्लेख करेन. त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाचा विचार न करता, स्वतःसाठी कुठलाही उत्पन्न स्त्रोत निर्माण न करता निस्सीम पणाने जनतेची सेवा करत राहिले. सर्वसामान्यांचे नेतृत्व असणार्‍या अशा सन्माननीय नेत्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेलेच पाहिजे.

रायगड नवी मुंबई कोकण किनारपट्टी सह संपूर्ण महाराष्ट्रातून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला जात आहे. ‘दिबां’चे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या आंदोलनात आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून रायगड, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण पालघर, नवी मुंबई अशा विविध ठिकाणचे 5000 वकिलांची फौज आंदोलनात उतरवणार आहोत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply