पनवेल : वार्ताहर
महाराष्ट्र पोलीस महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईफ व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2019 दरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत सर्वत्र बालकांची सुरक्षितता या संदर्भात पनवेल तालुका पोलिसांनी महाविद्यालयात जावून पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांची जनजागृती केली. या जनजागृती निमित्ताने माध्यमिक विद्या मंदिर पोयंजे, ता.पनवेल येथे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कालिदास शिंदे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, बीट अधिकारी सपोनि आर. एस. गोपाळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना बालकांचे हक्क व सुरक्षिततेसंबंधी भारतीय संविधान बालकांसंबंधी कायदे व त्यातील तरतुदीबाबत सविस्तर माहिती देऊन आपत्कालीन यंत्रणा चाईल्ड लाईन नं. 1098, पोलीस चाईल्ड हेल्पलाईन 103 याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी असे एकूण 230 जण उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए. एस. चव्हाण, हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल निलम पाटील आदी मान्यवरांनी विशेष मेहनत घेतली.