कर्जत : बातमीदार : पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) नगर परिषदेतर्फे साजरा होणार आहे. पर्यटकांना या वाढदिवसाचे साक्षीदार होण्याचा मान मिळणार आहे.
ठाण्याचे तत्कालीन इंग्रज कलेक्टर एच. पी. मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरानचा शोध लावला होता. त्यास 169 वर्षे होत असून, हा वाढदिवस नगर परिषदेतर्फे माथेरानमधील नौरोजी उद्यानात अतिशय थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती व पंजाबी वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर होणार असून, माथेरानच्या हिरवळीत हा वाढदिवस सर्व पर्यटकांच्या साक्षीने साजरा होणार आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी या वाढदिवसाला उपस्थिती दाखवावी, असे आवाहन नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी केले आहे.