Breaking News

पालकांनो, सावधान…

कळंबोली येथील सुधागड हायस्कूल मधील अकरावीच्या विद्यार्थ्याला  कॉलेजमध्ये  जाण्यासाठी  वडिलांनी मोटरसायकल दिली नाही म्हणून शाळेच्या बाथरूम मध्ये त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामध्ये त्याचे प्राणही गेले. त्यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण पसरेल असल्याची चर्चा शाळांच्या गेटवर सुरू झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवस ही चर्चा सुरू राहील आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या ज्यनियर कॉलेज मध्ये अकरावी सायन्समध्ये शिकणार्‍या शिवम यादवने शुक्रवारी सकाळी वडील दीपक यादव यांच्याकडे कॉलेजला जाणेसाठी मोटारसायकल मागितली. त्यांनी नकार दिल्यामुळे त्याला राग आला. सकाळी 7.30 वाजता कॉलेजमध्ये आल्यावर त्याने  आपल्या वर्गात न जाता दुसर्‍या मजल्यावरील बाथरूममध्ये जाऊन कडी लावून सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेऊन तो बाहेर आला. शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, पण त्याचे प्राण वाचू शकले नाही. 

आज आई-वडील नोकरी करीत असतात. त्यामुळे घरात मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसते. आपल्या मुलाची प्रत्येक मागणी कोणताही विचार न करता पुरवण्याकडे पालकांचा कल असतो. मुलाने काही मागितले की त्याला मिळते. त्याला दिले नाही नाही की मुले हट्ट करतात. पालक आपली परिस्थिती नसली तरी मुलांचे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करीत असतात. आज पालकांना आपल्या मुलाने हे केले ते केले सांगण्यात धन्यता वाटते. लहान मुलांना दुचाकी वाहन चालवायला देऊ नका, असे पोलीस अधिकारी सांगत असतात (त्यांची मुले काय करतात हा वेगळा विषय होईल) पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या सोसायटीत मुलाचे कौतुक करता यावे म्हणून सुशिक्षित पालक यामध्ये आघाडीवर असतात. माझ्या माहितीत एका डॉक्टरने आपल्या 12 वर्षाच्या मुलाला कार चालवायला शिकवली त्याचे फोटो काढून स्थानिक वर्तमानपत्रात छापून आणले, पण कायदा मोडला म्हणून त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तर त्याचे आणि मुलाचे कौतुक झाल्याने इतर पालिकांना ही आपल्या मुलाने असे काही तरी करावे, असे वाटू लागते.

खरे तर पोलिसांनी अशा वेळी पालकांवर गुन्हा दाखल केला, तर सोसायटीमध्ये माझा मुलगा कसा हुशार आहे हे दाखवण्यासाठी पालक  असे बेजवाबदारपणे वागणार नाहीत, पण आज पोलिसांना पैसे देऊन किवा राजकीय वजन वापरून सगळे मिटवता येते याची खात्री पालकांना असते आणि आपले पालक मिटवतील अशी खात्री मुलांना झाल्याने मुले बेदरकार वागताना दिसत आहेत. अनेक वेळा पेट्रोलसाठी  घेतलेल्या पैशाची मुले दारू पितात आणि मग सोसायटीतील दुसर्‍यांच्या गाडीतील पेट्रोल चोरण्यास सुरुवात करतात. पालकांना त्यांच्याकडे लक्ष  द्यायला वेळ नसतो. मग हळूहळू सवय लागते. मुले गुन्हेगारीकडे वळतात. अनेक अट्टल गुन्हेगार असे तयार झालेले आपण वाचतो आणि सोडून देतो. त्यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. मुलांच्या हट्टामुळे काही वेळा त्यांना स्वत:चा जीवही गमवावा लागतो, तर कधी निष्पाप जीव नाहक जातात. काही वर्षापूर्वी पालीला हायस्कूलच्या मैदानावर गाडी शिकताना एका तरुणीने दोघांना उडवले. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तिचे भविष्य संपले, पण दोन निष्पाप जणांना आपले प्राण गमवावे लागले. ऐन दिवाळीत पनवेलच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांना अशाच प्रकारे आपले प्राण गमवावे लागले.

शिवमच्या मृत्यू मुळे तरी पालकांनी आता सावध व्हायला हवे. आपल्या मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी गाड्या देताना प्रथम त्याला वाहन चालवण्याचे आवश्यक प्रशिक्षण आणि परवाना काढून दिला पाहिजे. तो काय करतो याची माहितीही घेतली पाहिजे. पोलिसांनी पकडल्यावर राजकीय नेत्यांनीही आपली जवाबदारी ओळखून अशा प्रकारात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये. शाळांनी ही लहान मुलांना शाळेत गाड्या आणण्यास बंदी केली पाहिजे तशी पालकांना सूचना दिली पाहिजे. शासनाने नवीन मोटर वाहन कायद्यात बदल केले आहेत त्याचा वापर पोलिसांनी प्रामाणिकपणे करून लहान मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply