नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसद भवनामध्ये पाऊण तास चर्चा झाली. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत शेतकरीप्रश्नी चर्चा झाली, पण राजकीय चर्चा झाली नाही, असे पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी राज्यातील नुकसानाची माहिती पंतप्रधान मोदींना देत वसंतदादा इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात होणार्या साखरेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रणही दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली.