अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रायगडने शबरी व आदिम या आवास योजानांमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला, तर पंतप्रधान आवास योजनेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आवास दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना उत्कृष्ट रितीने राबविणार्या जिल्ह्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सामाजिक न्याय विभागचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, राज्य व्यवस्थापक धनंजय माळी आदी उपस्थित होते
राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेतंर्गत प्रथम टप्प्यात रायगड जिल्ह्याला 1339 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. (पान 2 वर..)
यातील 1333 घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी 1099 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली. 82.1 टक्के घरकुले पूर्ण करून रायगडने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या पेण, खालापूर व म्हसळा गटविकास अधिकार्यांचादेखील या वेळी सत्कार करण्यात आला.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रकाश देवॠषी, गटविकास अधिकारी सी. पी. पाटील, वाय. एन. प्रभे, संजय भोये यांनी पुरस्कार सन्मान स्वीकारला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.