पनवेल : रामप्रहर वृत्त
रसायनी परिसरातील नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली गुळसुंदे येथे नुकतीच नियोजन बैठक झाली.
या बैठकीस गटविकास अधिकारी श्री. तेटगुरे, पाणीपुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, माजी सरपंच आर. डी. पाटील, माजी उपसरपंच यशवंत जाधव, सदस्य मनोज पवार, प्रभावती कार्लेकर, उपासना गोठळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी, तुराडे, कष्टकरी नगर, वावेघर, सावळे, देवळोली, दापिवली व परिसरातील इतर गावांना व्यवस्थित पाणी मिळाले पाहिजे यासाठी आमदार बालदी यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने या गावांना कोणत्या जलस्रोतातून पाणी मिळविता येईल व त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार अधिकारी अहवाल देणार असून, पाणीपुरवठ्यासाठी कार्यवाही होणार आहे.