पनवेल : वार्ताहर
पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तिघा लुटारूंनी पनवेल येथील डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडचाळ, रोख रक्कम आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील तक्रारदार देवानंद प्रकाश खंडारे (35) कर्जत येथे राहण्यास असून तो पनवेल न्यायालयात कनिष्ठ लिपीक म्हणुन कामाला आहे. घटनेच्या दिवशी देवानंद न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाला होता. यावेळी तो ठाणा नाका येथे 20 ते 25 वयोगटातील तरुणाने आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याला पुढे सोडण्याची विनंती केली. त्यामुळे देवानंद याने सदर तरुणाला आपल्या मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर सदर तरुणाने देवानंद याला प्रथम करंजाडे येथे आणि त्यानंतर त्याला डोंबाळा कॉलेज लगतच्या महादेव मंदिराजवळ नेले. सदर ठिकाणी उभ्या असलेल्या या तरुणाच्या इतर दोघा साथीदारांनी देवानंद याला जबरदस्तीने लुटण्यास सुरुवात केली. त्यामुळे देवानंद याने त्यांना विरोध केला असता, त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारह्मण करुन त्याच्या मोबाईलचा पासवर्ड मिळविला. त्यानंतर त्यांनी देवानंद कडून जबरदस्तीने गुगल पेचा देखील पासवर्ड घेतला. मात्र, त्यांना गुगल पेचा वापर करता आला नाही. याचवेळी एका लुटारूने देवानंदच्या मोटारसायकल मधील पेट्रोल काढून घेतले.
यावेळी देवानंदने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला हेल्मेटने बेदम मारहाण केली. त्यानंतर एका लुटारूने त्याच्या हातातील घड्याळ तसेच मोटारसायकलची बॅटरी काढून घेत मोटारसायकलचे हेडलाईट तोडून टाकले. त्यानंतर सदर लुटारुंनी देवानंदला सोडल्यानंतर त्याने मोटारसायकल ढकलत हायवे गाठले. तेथून पेचा त्याने रिक्षाने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.