Friday , June 9 2023
Breaking News

सलग सहाव्यांदा सुनीत जाधव ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा, चारही जेतेपदं मुंबईकडे

मुंबई : प्रतिनिधी

मध्यरात्री दीडच्या ठोक्यालाही प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष… महागणपतीच्या साक्षीने टिटवाळाकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद… सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच बाजी मारली. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने सलग सहाव्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करीत जेतेपदाचा अनोखा षटकार ठोकला. एवढेच नव्हे तर अन्य तिन्ही स्पर्धामध्येही मुंबईने विजयश्री संपादत चौकार ठोकला आणि सांघिक विजेतेपदावरही आपलेच शिक्कामोर्तब केले. मिस मुंबई मंजिरी भावसारने आपल्या पीळदार आणि सौंदर्याचा अनोखा मिलाप सादर करीत फिजीक स्पोर्टस् प्रकारात मिस महाराष्ट्रचे जेतेपद पटकावले, तर मुंबईच्याच अमला ब्रह्मचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त पीळदार देहाचे प्रदर्शन घडवत मिस महाराष्ट्रचा मान मिळविला. पुरुषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबईच्याच रोहन कदम सरस ठरला.

क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या माध्यमातून साकारलेला शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा बॉलीवूडच्या इव्हेंटला साजेसा असाच झाला. एकापेक्षा एक स्पर्धक, विक्रमी बक्षिसे, विक्रमी गर्दी, विक्रमी प्रतिसाद असे अनेक विक्रम नोंदविणार्‍या ‘महाराष्ट्र श्री’चे दिमाखदार आयोजन डोळे दिपवणारे ठरले. या भव्यदिव्य स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आयोजक संतोष तरे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, सरचिटणीस विक्रम रोठे, कार्याध्यक्ष अजय खानविलकर, ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, मुंबई संघटनेचे राजेश सावंत, सुनील शेगडे, मदन कडू यांच्या उपस्थित पार पडला.

  • सुनीतने पराभवाचा घेतला बदला

गेल्याच आठवड्यात नवी मुंबईत झालेल्या ‘एनएमएसए श्री’ स्पर्धेत ठाण्याच्या सागर माळीने सुनीत जाधवचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महाराष्ट्रात आपल्या समोर कुणीही टिकणार नाही, याच भावनेने पूर्ण तयारीत नसलेला सुनीत स्पर्धेत उतरला खरा, पण त्याला 90 किलो वजनी गटात अनपेक्षितरीत्या तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्याच महिन्यात ‘आशिया श्री’ पटकावण्याचा पराक्रम गाजवणार्‍या सुनीतसाठी हा धक्का होता. या गटात सागरने पुण्याच्या महेंद्र चव्हाणलाही पछाडून आपले जेतेपद निश्चित केले होते. या विजयामुळे सागरचा आत्मविश्वास उंचावला होता. सुनीतची ‘महाराष्ट्र श्री’ जेतेपदाची मालिका सागर खंडित करणार, असे चित्रही उभे राहिले होते, पण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत जेव्हा सुनीतसमोर सागर, अनिल बिलावा आणि महेंद्र पगडे आले तेव्हा चित्र स्पष्ट झाले. तरीही जजेसने सुनीत, सागर आणि अनिलची कंपेरिझन करून सुनीतच्या षटकारावर शिक्कामोर्तब केले. 80 किलो वजनी गटात खेळणार्‍या अनिल बिलावाने सुनीतला जबरदस्त टक्कर दिली, पण त्याची देहयष्टी सुनीतच्या मानाने किंचीतशी छोटी असल्वयामुळे सुनीत सरस ठरला. दमलेल्वया सागरला कंपेरिझनदरम्यान काही पोझेस परफेक्ट मारता आल्वया नाहीत. त्यामुळे तो सुनीतला हरवण्यात अपयशी ठरला.

  • मुंबईकर अमला, मंजिरी मिस महाराष्ट्र

पूर्ण स्पर्धेवर मुंबईच्या खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यभरातून आठ स्पर्धकांचा सहभाग उत्साह उंचावणारा होता. गेल्या महिन्यात शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेणार्‍या मुंबईच्या अमला ब्रह्मचारीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिस महाराष्ट्र होण्याचा मान मिळविला. गेल्या महिन्यात तिने आपली पहिलीच स्पर्धा खेळताना चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये सुवर्ण जिंकून पराक्रम गाजवला होता, तर आज तिने राज्यातील तन्वीर फातिमा, श्रद्धा डोके, मयुरी पोटे या खेळाडूंवर सहज मात करीत आपले जेतेपद निश्चित केले. महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात डॉ. मंजिरी भावसारने मुंबईच्याच दीपाली ओगळेची कडवी झुंज मोडीत काढत आपल्या विजयाची मालिका कायम ठेवली. मिस मुंबई तर मिस महाराष्ट्र झालेल्या मंजिरीने विजयानंतर आता मिस इंडिया किताब जिंकून हॅटट्रीक करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply