Breaking News

शिवसेनेचे सरकार वसुली सरकार!

देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

सिल्वासा ः वृत्तसंस्था
शिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवले जात आहे. शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करीत असलेले काम पाहा. वसुली सुरू आहे. ते पाहता महाराष्ट्रातील सरकार आता वसुली सरकार झाले आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गावित यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सिल्वासा येथे जाहीर सभा झाली. या सभेला केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम नृपाला, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आदी नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.  
या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेच्या कारभाराला फडणवीस यांनी मोघलांची उपमा दिली. ते जिथे आहेत, त्यांना तिथेच ठेवा. ते इथे आले, तर नाव तर महाराष्ट्राचे घेतील, पण काम मोघलांचे करतील, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply