राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचा निर्णय घेऊन सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची तिसरी आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती राज्याचे प्रमुखपद भूषवत आहे. 56 जागांच्या जोरावर मुख्यमंत्रिपद मिळविणे शिवसेनेसाठी अनपेक्षित यश मानले जात असले तरी उद्धव यांच्यासाठी ‘सीएम‘पद हा काटेरी मुकूट आहे, तर भिन्न विचारसरणी व कार्यशैली असलेल्या तीन पक्षांच्या सरकारपुढे आपसात समन्वय राखून यशस्वीपणे राजशकट हाकणे अनेक परींनी आव्हानात्मक असेल…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घडल्या नाहीत एवढ्या घडामोडी निवडणुकीनंतर घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईपर्यंत जी नवनवीन वळणे पाहायला मिळाली ती यापूर्वी क्वचितच कुठे अनुभवायला आली असतील. राजकीय धक्क्यांनी देश हलला. विशेषकरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपची साथ दिल्याने सारेच हबकले. अजितदादांना पक्षाध्यक्ष शरद पवारांचा पाठिंबा आहे की काय, अशाही शंका उपस्थित झाल्या, मात्र हे बंड असल्याचे काही वेळाने स्पष्ट झाले. हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे आमदार धाकल्या पवारांसोबत गेले होते तेही ‘मोठ्या साहेबां’कडे परतल्याचे दिसले. अखेर अजित पवारांनी बंडाची तलवार म्यान करीत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परिणामी बहुमताचा आकडा जुळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजप आता प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करण्यात आले. दुसर्याच दिवशी 28 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा झाला. या वेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी, तर तीन पक्षांचे प्रत्येकी दोन नेते अशा सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांचा समावेश आहे. पुढे विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री यांची निवड, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप अशी प्रक्रिया आहे. हे सारे करताना दोन्ही काँग्रेसशी जुळवून घेत सरकार चालविण्याचे ‘शिवधनुष्य’ मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पेलावे लागणार आहे.
मुळात उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी कोणतेही घटनात्मक पद भूषविलेले नाही. आता एवढ्या मोठ्या राज्याचे तेही मुख्यमंत्रिपद त्यांना सांभाळायचे आहे. एखाद्या पक्षाचे नेतृत्व करणे व राज्याचा प्रमुख म्हणून काम करणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे. त्यामुळे ठाकरे यांना सर्वप्रथम प्रशासकीय कामकाज शिकावे लागेल. त्याच वेळी या माध्यमातून राज्याचे चक्र गतिमान ठेवावे लागेल. घटनात्मक पदावर नसताना बोलणे, आदेश देणे सोपे असते. कारण त्याची अंमलबजावणी स्वत:ला करायची नसते, पण पदाबरोबर जबाबदारीही येते. मग मात्र स्वत:ला पुढाकार घ्यावा लागतो. चांगल्या-वाईट परिणामांचे उत्तरदायित्वही आपसूकच शिरावर येणार असते. या पार्श्वभूमीवर नवे मुख्यमंत्री कसे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडी म्हणून सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्वी भाराभर आश्वासने दिली आहेत. यातील दोन्ही काँग्रेस विरोधी पक्षांत होते, तर शिवसेना सत्तेत असूनही भाजपकडे
अंगुलीनिर्देश करीत विरोधी पक्षाची भूमिका बजावत होती. चांगल्या सदस्यसंख्येने सत्तेत येण्यासाठी या तीन पक्षांनी वैयक्तिकपणे आश्वासनांचा पाऊस पाडला, तर नंतर एकत्र येत किमान समान कार्यक्रम घोषित केला आहे. यात शेतकर्यांना कर्जमाफी, युवकांना रोजगाराची संधी, 10 रुपयांत जेवण यांसारख्या अनेक बाबींचा समावेश आहे. हे सर्व ते प्रत्यक्षात कधी घडवून आणणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष असणार आहे.
राज्यातील नवे सरकार तीन पक्षांचे मिळून बनले आहे. सर्वसामान्यपणे बहुमत गाठण्यासाठी दोनपेक्षा अधिक पक्ष एकत्र आल्यावर त्या सरकारला कसरत करावी लागते. आजवर देशात अशी अनेक सरकारे मुदतीआधीच कोसळली आहेत. याचे कारण म्हणजे सत्तेसाठी एकत्र आलेले बरेच घटक पक्ष खूप काही अपेक्षा ठेवून असतात. त्यामुळे सुरुवातीला ते शांत राहतात किंवा तसे भासवतात, मात्र हळूहळू आपले रंग दाखवू लागतात. मग एखादी गोष्ट वा निर्णय मनासारखा झाला नाही की त्यांच्यात कुरबुरी सुरू होतात. कधी कधी मतभेद तीव्र होऊन दबावतंत्राचा वापर केला जातो. प्रसंगी टोकाचा निर्णयही होऊ शकतो असा इतिहास आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मित्रपक्षांच्या राजीखुशीने घ्यावा लागेल. यात शिवसेना वरचढ दिसायला नको व सहकारीही दुखवायला नको. दोन्ही काँग्रेसने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यास ठाकरेही गप्प बसणारे नाहीत. ठरावीक मर्यादेपर्यंत सहन केल्यानंतर ते आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणू शकतात. अर्थात सध्या तरी सारे आलबेल दिसत आहे. नव्या सरकारच्या कार्यकाळात पुढे काय वाढून ठेवलंय हे पाहण्यासाठी काही दिवस जावे लागतील. मगच अंदाज येऊ शकेल. तोवर वेट अॅण्ड वॉच..!
भाजपशी ‘सामना’
भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पारदर्शी, गतिमान व लोकाभिमुख कारभार करून जनतेला सुशासन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राज्यात नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकटांना धैर्याने सामोरे जात नागरिकांना आधार दिला. तेच फडणवीस आणि तोच भाजप आता विरोधी पक्षात आहे. त्यामुळे विद्यमान सरकारचा निर्णय चुकला किंवा फसला, तर ‘सामना’ भाजपशी असणार आहे.
-समाधान पाटील, अधोरेखित