Breaking News

अभिमानाचा तुरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नव्या भारता’चे एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार म्हणून सुंदर पिचाई यांच्याकडे पहावे लागते. त्यांनी अनेकदा या ना त्या कारणाने पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीबद्दल आस्था व्यक्त केली आहे. जगभरात चीन वगळता बहुतेक सर्वच देशांमध्ये गुगलने आपली पाळेमुळे पसरली आहेत. किंबहुना, गुगलची उत्पादने न वापरणारा असा देशच नसेल.

महागाई आणि आर्थिक घडी विस्कटल्याचे मुद्दे उपस्थित करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची जमेल तितकी बदनामी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न अहोरात्र चालू असताना अमेरिकेच्या दिशेने मात्र एक सुंदर बातमी कानावर आली आहे. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन या जोडगोळीने आपापली सर्वोच्च पदे सोडून देत सारी सूत्रे मुख्याधिकारी पिचाई सुंदरराजन उर्फ सुंदर पिचाई यांच्याकडे सोपवली आहेत. पिचाई हे गुगलचे सर्वेसर्वा आहेतच, पण नव्या निर्णयानुसार गुगलची पालककंपनी ‘अल्फाबेट’ या कंपनीचेही सारे व्यवहार सुंदर पिचाई पाहतील. भारतीय वंशाचे, भारतातच शिक्षण घेतलेले सुंदर पिचाई 2004 साली गुगल परिवारात एक प्रशिक्षणार्थी म्हणून सामील झाले होते. पंधरा-सोळा वर्षांत हा प्रतिभावान भारतीय अभियंता जगातल्या एका बलाढ्य साम्राज्याचा सर्वेसर्वा होऊन बसला आहे. कुठल्याही भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल अशी ही घटना. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन या जोडीने नव्वदीच्या दशकात कॅलिफोर्नियातील एका मोटारीच्या गॅरेजमध्ये गुगलची मुहुर्तमेढ रचली होती. याच छोट्याशा व्यवसायाचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. अल्फाबेट आणि गुगल या कंपन्यांचे जागतिक बाजारमूल्य सुमारे 823 अब्ज डॉलर्स इतके मानले जाते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साधारणत: 24 लाख कोटींची आहे. म्हणजेच  भारतातील सुमारे अर्धा डझन राज्यांच्या अर्थव्यवस्थेइतका गुगलचा पसारा मानायला हवा. असे असूनही महाराष्ट्रातील सत्तानाट्याला महिना उलटला तरी त्याचा शेवट अजूनही दृष्टिपथात नाही. गुगल परिवारात झालेल्या या प्रचंड मोठ्या सत्तांतरामध्ये कुठलेही नाट्य नव्हते, कुटिल डावपेच, अधिकार्‍यांची पळवापळवी, आरोपप्रत्यारोपांच्या फैरी, गगनभेदी घोषणा असला कुठलाही प्रकार गुगलच्या सत्तांतरात नव्हता. अत्यंत समंजसपणे पेज-ब्रिन संस्थापक जोडगोळीने आपल्याकडील सारे अधिकार सुंदर पिचाईंना बहाल केले. गुगल सर्च इंजिन, गुगल मॅप्स, प्लेस्टोअर, युट्यूब, गुगल पे अशा कित्येक गुगल उत्पादनांना आपण सारेच सरावलो आहोत. किंबहुना गुगलविना कोणाचेही पान देखील हलू शकणार नाही. हवामानाच्या अंदाजापासून ते मनोरंजनापर्यंत आणि बँकिंग व्यवहारापासून प्रवासातील दिशादिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबतीत आपल्याला गुगलचीच साथसोबत असते. असे असले तरी नजीकच्या भविष्यातच गुगलला तिखट स्पर्धेला सामोरे जावे लागणार असल्याचे ओळखून पेज-ब्रिन या जोडीने समंजसपणे पुढल्या पिढीकडे कारभार सोपवला. अशी प्रगल्भता आणि परिपक्वता एखाद्या बलाढ्य कंपनीच्या मालकाने दाखवणे दुर्मिळच म्हणावे लागेल. गुगलच्या कारभारात काळानुरुप बदल करून, चिनी कंपन्यांनी उभ्या केलेल्या आव्हानाला परतवण्याचे अवघड कार्य सुंदर पिचाई यांना पार पाडावे लागणार आहे. आणि त्यांच्या या कार्यामध्ये मोठा सहभाग तुमच्या-आमच्यासारख्या भारतीय गुगल वापरकर्त्यांचा असेल हे उघड गुपित आहे. म्हणूनच गुगलमधील हे सत्तांतर भारताच्या प्रगतीतही आपला वाटा उचलेल आणि पंतप्रधान मोदी यांच्या नव्या भारताच्या स्वप्नाला बळ देईल ही अपेक्षा.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply