आमदार प्रशांत ठाकूर यांचा निर्वाणीचा इशारा
पनवेल : प्रतिनिधी
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल कंपनीमधील कामगारांना किरकोळ कारणावरून चुकीच्या पद्धतीने कामावरून निलंबित करण्यात आले होते. या कामगारांच्या हक्कासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) हायकल कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हायकल कंपनी व्यवस्थापनाला 13 डिसेंबरला आमची ताकद दाखवून देऊ, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. या गेट बंद आंदोलनास कामगारांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या हायकल कंपनीने क्षुल्लक कारणावरून चार स्थानिक कामगारांना निलंबित केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर रूजू करावे यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दोन बैठकाही झाल्या, मात्र व्यवस्थापनाने आडमुठी भूमिका कायम ठेवली. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेृत्वावाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, जितेंद्र घरत, बंडूशेठ गोंधळी, मयुरेश नेवकर, दिनेश खानावकर, प्रकाश खैरे, नंदकुमार म्हात्रे, श्यामशेठ पाटील, पांडुरंग पाटील, मोतीलाल कोळी, रवींद्र कोरडे, राजेंद्र तारेकर, रामदास गोंधळी, संतोष घरत, दीपक पाटील, महेश थळे, प्रकाश खानावकर, नासिर शेख, संदीप तांडेल, लक्ष्मण पाटील, दिनेश कदम, कृष्णा पाटील, दीपक उलवेकर आणि डॉ. यशवंत कोल्हटकर उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, व्यवस्थापनाला आम्हाला कंपनीचे उत्पादन कसे वाढेल तिची आर्थिक स्थिती कशी चांगली राहील यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत, पण व्यवस्थापन मात्र त्यासाठी सहकार्य न करता कामगारांना त्रास देत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. व्यवस्थापनाला आम्ही शुक्रवार 13 डिसेंबर रोजी आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
तसेच तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या भागातील ज्या दोन कंपन्यांनी कामगारांची पिळवणूक केली होती, त्यांना कसा धडा शिकवला याची आठवण व्यवस्थापनाला करून देत 13 तारखेला त्याची पुनरावृत्ती होईल, असा इशारा या वेळी दिला.