Breaking News

म्हसळ्यातील वाहतूक कोंडी कायम; नागरिक त्रस्त

म्हसळा : प्रतिनिधी

डिसेंबर एन्ड आणि नाताळच्या सुट्ट्या यामुळे श्रीवर्धन समुद्र किनारा, श्री क्षेत्र हरिहरेश्वर आणि दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदिर येथे मोठया संख्येने पर्यटक येवू लागले आहेत. तसेच दिघी बंदर आणि तुरूंबाडी येथील दास प्रकल्प येथील अवजड वाहतूक यामुळे म्हसळ्यातील नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला व त्यातून निर्माण होणार्‍या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगरकडे जाण्यासाठीचा रस्ता म्हसळा शहरातून जातो. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिघी बंदर आणि तुरूंबाडी येथील दास प्रकल्प येथील अवजड वाहतूकही म्हसळ्यामधूनच होते. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याच रस्त्यावर म्हसळा बाजारपेठ आहे.  आता या मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ सावरफाटा ते दिघी नाका, दिघी नाका ते सकलप फाटा आणि दिघी नाका ते ताज बेकरी अशी विस्तारली असली तरी या रस्त्यावरील फेरीवाले, वाहने, रिक्षा व त्यांचे स्टँड (थांबे), माल वाहतुक करणार्‍या गाड्या यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अनधिकृत पार्कींग, मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा वावर यामुळे म्हसळा शहरातील या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे शहरातील स्थानिक पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला  या सर्वाना दिवसेंदिवस शहरांतील या मुख्य रस्त्यावरून चालणेही दुरापास्त होत आहे. म्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या आता सोडविण्या पलीकडची झाली आहे, त्याला नगरपंचायत व पोलीस प्रशासन  जबाबदार आहे, असे नागरिकांचे मत होत आहे. अशा परिस्थितीत केवळ दोन वाहतूक पोलीस म्हसळ्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र ते अपुरे पडत असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडे सतत मागणी करूनही वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली जात नाही.म्हसळा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून चार वर्षे झाली. मात्र करवाढी व्यतिरीक्त नगरपंचायतीने शहरातील वाहतूक सुकर व्हावी, म्हणून काहीही प्रयत्न केले नाहीत. शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी नगरपंचायतीने शहरात टू व्हिलर पार्कींगची सुविधा सुरु करावी, रिक्षा थांबे व वाहनांची संख्या निश्चित करावी, अनधिकृत टपर्‍या व हातगाडीवाल्यांना योग्य जागा द्यावी, मोकाट गुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी कोंडवाडा कार्यरत करावा, असे  नागरिकांचे म्हणणे आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत शहरातील वाहतूकीच्या संदर्भात म्हसळा नगरपंचायत प्रशासनाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही.

-अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक, म्हसळा

श्रीवर्धन आगारांतून मुंबई व लांब पल्ल्याला जाणार्‍या एसटी गाड्या म्हसळा बायपासने सोडाव्यात आणि लोकल गाड्या शहरातून सोडाव्यात. तसेच येणार्‍या सर्व गाड्या म्हसळ्यातून याव्यात. अवजड वाहनांनाही शहरातून जाण्या-येण्यास बंदी घालावी.

-दादा विचारे, निवृत्त कंडक्टर, म्हसळा

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply