दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिस्तीजन ख्रिसमस म्हणजेच मराठीत ’नाताळ’ हा सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती धर्मश्रद्धेनुसार या दिवशी ख्रिस्त राजा म्हणजेच येशू हा जगाला तारणारा जन्मास आला हे सत्य मानतात. देवाने खुद्द येशूच्या रूपात देह धारण करून मानव धर्म स्वीकारला. केवळ सर्व जगाचे तारण व्हावे, येशूच्या शिकवणीनुसार सर्व लोकांना सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे, हाच संदेश या दिवशी दिला जातो. मी जगात अवतरलो आहे. तुम्हा सर्वांना जीवनाचे पूर्णत्व लाभावे, (जॉन 10ः10) असे येशूचे वचन बायबलमध्ये सापडते. ख्रिसमसच्या पूर्वतयारीसाठी सर्व चर्चमध्ये लोकांच्या आध्यात्मिक तयारीला महत्त्व दिले जाते, तसेच सर्व चर्चमध्ये, कुटुंबात रोषणाई केली जाते. घरोघरी स्वादिष्ट केक, मिठाई बनवून शेजार्यांना, नातेवाइकांना वाटली जाते. या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद व्यक्त करतात. काही सामाजिक, धार्मिक संस्था गोरगरिबांसाठी कार्यक्रम आयोजित करून मोफत जेवण देऊन ख्रिसमसचा आनंद द्विगुणीत करतात. ख्रिसमस म्हणजे शांती, आनंद, प्रेम, क्षमा, शेजारधर्म अशा सुंदर धाग्यांनी विणलेला सण. हाच संदेश घेऊन आपण सर्व जातीधर्मीयांशी प्रेमाने, शांतीने, आपुलकीने वागावे. सर्वांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
-फादर जेम्स कोरिया, उरण