खोपोली पालिकेकडे कोणत्याही उपाययोजना नाहीत
खोपोली : प्रतिनिधी
भटक्या विशेषतः पिसाळलेल्या कुत्र्यांनी संपुर्ण खोपोली शहरात दहशत निर्माण केली आहे. मागील दोन महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात विविध ठिकाणी 16 जण जखमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नगरपालिका दवाखान्यात रेबीजवरील औषधे व इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने, या कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप घेत आहे.खोपोली शहरात सर्व ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी आहेत. यातील काही कुत्री जखमी असल्याने ती पिसाळली आहेत. यातून लहान मुले, पादचारी व दुचाकीस्वार यांच्यावर ही कुत्री अचानक हल्ला करण्याचा घटना सतत घडत आहेत. नोव्हेंबर महिन्यात 9 तर डिसेंबर महिन्यात आत्तापर्यंत 07 जणांवर या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे. ही कुत्री चालत्या वाहनांवर अचानक धावून जात असल्याने अनेक वेळा अपघातही घडत आहेत. नगरपालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे. मात्र नगरपालिकेकडे यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही.
भटकी कुत्री ही खोपोलीची प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे वेळोवेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून नगरपालिकेकडून लवकरात लवकर योग्य उपाययोजना होण्याची गरज आहे.
-गुरुनाथ साठेलकर, अध्यक्ष, आपत्कालीन मदत गृप खोपोली
प्रस्तावित कायदा व नियमानुसार या कुत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही उपाययोजना करता येत नाही. नगरपालिकेकडून अशी कुत्री पकडून त्यांच्यासाठी असलेल्या अधिकृत यार्डमध्ये हलविण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यादृष्टीने चौकशी सुरू असून, लवकरच अशी मोहीम सुरू करण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे.
-गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपालिका