Breaking News

शिवसेनेचे 14 आमदार नाराज, मंत्रिपद न मिळाल्याने डावलल्याची भावना

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी डोके वर काढले आहे. यात शिवसेनेमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे किमान 14 आमदार नाराज असल्याचे कळते. हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यापुढे मांडणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात विशेषत: शिवसेनेतील अनेक प्रस्थापितांना धक्का देण्यात आला आहे. मंत्रिपदाचा अनुभव असलेले दिवाकर रावते, रामदास कदम, भास्कर जाधव, रविंद्र वायकर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांसारख्या चेहर्‍यांना विश्रांती देत उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. हे करतानाच अनेक इच्छूकांचाही ऐनवेळी पत्ता कापण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद वाढली असून ती अनेक प्रकारे बाहेर येऊ लागली आहे.

रामदास कदम हे कमालीचे नाराज असून ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. कदाचित माझी निष्ठा कमी पडली. येत्या काळात ती मी दाखवून देईन, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून शिवसेनेत आलेले कोकणातील नेते भास्कर जाधव यांनीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असे म्हणत आपले गार्‍हाणे मांडले. मी सत्तेत नसलो तरी सत्ताधारी पक्षात आहे. मी कुठे कमी पडलो, माझे काय चुकले हे मी उद्धव ठाकरे यांना विचारणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितला असून ते माझी नाराजी दूर करतील असे मला वाटते, असे जाधव म्हणाले. मंत्रिमंडळात मी असेन असे वाटले होते मात्र शेवटच्या क्षणी काय झाले हे मला माहित नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

नाराजांच्या यादीत सुनील राऊत, रविंद्र वायकर, सुनील प्रभू अशी नावेही आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, सुनील राऊत यांना डावलण्यात आल्याने राऊत बंधू नाराज असल्याची चर्चा असली तरी नाराजीचे वृत्त दोघांनीही फेटाळले आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले तानाजी सावंतही नाराज असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून जाब विचारल्याचे कळते. यावेळी उद्धव व सावंत यांच्यात खटके उडाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे मंत्रिपद हुकल्याने नाराजी असताना दुसरीकडे संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्याने यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी नाराज असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीवेळी राठोड यांनी गवळी यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळेच राठोड यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून गवळी प्रयत्नशील होत्या असे कळते. आता राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर गवळी या खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत.

हे 14 आमदार नाराज

रामदास कदम, दिवाकर रावते, भास्कर जाधव, दीपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत सुनील प्रभू, सुनील राऊत, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशीष जैस्वाल, संजय रायमुलकर, संजय शिरसाट, अनिल बाबर.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply