Breaking News

‘त्या’ बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले

पनवेल : प्रतिनिधी

पनवेलमध्ये तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेत लाल रंगाच्या ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तिचे नाव कळाले असून त्याचे नाव इमरान उर्फ छोटू असल्याचे कळाले आहे. छोटूच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून लालता प्रसाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली.

9 डिसेंबरला पनवेल पोलिसांना वीटभट्टी शेजारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा चेहरा प्लॅस्टिकने गुंडाळलेला होता. त्याच्या अंगावर असलेले कपडे आणि हातातील अंगठीमुळे या व्यक्तिची ओळख पटली. सलीम नावाच्या रंगकाम करणार्‍या व्यक्तिने हा मृतदेह इमरानचा असल्याचं सांगितले. तो आपल्यासोबत काम करत होता असेही सलीमने सांगितले. तपासादरम्यान पोलिसांना कळालं की इमरान हा मूळचा उत्तर प्रदेशातील तुलसीपूर गावचा रहिवासी होता.

पनवेल पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशाकडे रवाना झाले. पोलिसांना इमरानच्या हत्येमागे लालता प्रसाद नावाच्या व्यक्तिचा हात असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याला इमरानच्याच गावातून शोधून काढत मपनवेल पोलीस ठाण्यात आणला. कसून चौकशी केल्यानंतर लालता प्रसादने त्याचा गुन्हा कबूल केला. इमरानला त्याने का मारले याचे कारणही त्याने पोलिसांना सांगितले. लालता प्रसादचे संध्या नावाच्या महिलेसोबत लग्न झाले होते. घरच्यांचा विरोध असल्याने हे दोघे वेगळे राहात होते. या दांपत्याला दोन मुलीही आहेत. मधल्या काळात इमरानने संध्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. संध्या घरसंसार सोडून इमरानसोबत पनवेलला पळून आली. या दोघांना एक मुलगीही झाली. सुरुवातीला काही दिवस चांगले गेल्यानंतर इमरराने संध्याला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे संध्याने लालता प्रसादला म्हणजेच पहिल्या नवर्‍याला फोन केला आणि पनवेलला बोलावून घेतलं. तिने लालता प्रसादला सगळा प्रकार सांगितला, ज्यामुळे तो भडकला होता. एक डिसेंबरच्या रात्री त्याने इमरान झोपेत असताना त्याची गळा दाबून हत्या केली. इमरानचा मृतदेह बॅगेत कोंबून त्याने रात्रीच नाल्यामध्ये फेकून दिला आणि लालता प्रसाद संध्यासह गावाला निघून गेला. पोलिसांच्या जबरदस्त तपासामुळे लालता प्रसादचे बिंग फुटले आणि त्याला अटक करण्यात आली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply