Breaking News

फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला.

हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुबोध भिडे, भारत विकास परिषदे पनवेलचे अध्यक्ष गिरिष समुद्र व ज्युपिटर डायकेमचे संचालक सी. चेलप्पन तसेच महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, शाळा समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, शाळा समितीचे महामात्र अतुल कुलकर्णी उपस्थित होते. 

डिजिटल क्लासरुमचे व्हर्च्युअल उद्घाटन सी.चेलप्पन यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्यालयातील सहा. शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी पहिला डेमो लेसन घेतला. व्यासपिठीय कार्यक्रमामध्ये प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी मान्यवरांचा सत्कार स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन केला.

ज्युपिटर डाय-केम चे व्यवस्थापकीय भागीदार रमेश चोखानि यांच्यामुळे या उद्योग समूहाच्या सीएसआर अंतर्गत, विद्यालयाच्या वीस खोल्या या डिजिटल क्लासरुम शक्य झाले. विद्यालयातील इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी माध्यमातील सर्व वर्गखोल्या डिजिटल असणारी पनवेल परिसरातील ही एकमेव डिजिटल हायटेक असणारी पहिली वहिली शाळा म्हणून पनवेल परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमास शाळेचे हितचिंतक व स्नेही उपस्थित होते. सहा. शिक्षिका स्वाती बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांचे आभार विजय भालेराव यांनी मानले तसेच या ई- क्लासरूमचा उपयोग हा पुस्तकांच्या पलिकडील ज्ञान आत्मसात करण्यासाठी होईल याची ग्वाही दिली. विद्यालयाच्या लिपिक उमा इनामदार यांच्या पसायदान  गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply