पनवेल : वार्ताहर
शालेय विद्यार्थिनींसह महिलावर्गाने त्यांच्यावर कोठेही अन्याय होत असेल असे त्यांना वाटल्यास तातडीने त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत महिलांनी अन्याय सहन करू नये, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांनी तालुक्यातील मोर्बे गावातील महिलावर्गाला व नागरिकांना
मार्गदर्शन करताना केले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे, पोलीस हवालदार संजय लोंढे, सतीश मुळे, पोलीस शिपाई विद्याधर गायकवाड, यादव, गावित, पोलीस पाटील संजय पाटील, रवींद्र पाटील, शोभा जाधव, सरपंच सारिका तांबडे, उपसरपंच रामचंद्र पाटील, शालेय शिक्षक मुरलीधर उपरे यांच्यासह शालेय विद्यार्थी व महिला, ग्रामस्थ यांची उपस्थिती होते. पोलीस दिनाच्या निमित्ताने सायबर क्राईम, महिला सुरक्षा कायदा संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांनी उपस्थित महिलावर्गाला मार्गदर्शन केले. आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याची दाद मागण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलावर्गाला केले, तसेच पोलीस ठाण्याची दारे आपल्यासाठी 24 तास खुली असून अडचण असल्यास त्यांनी महिला अधिकारीवर्गाशी संपर्क साधून त्यांच्यासमोर समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.