कोळी बांधवांची लगबग वाढली; सामानाची जुळवाजुळव
मुरूड : प्रतिनिधी
मच्छिमारीवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपत असल्याने मुरूडमधील कोळी बांधवांची खोल समुद्रात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याची पूर्व तयारी म्हणूून होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती पुर्ण करून कोळी बांधव होड्यांमध्ये तेल, बर्फ, मीठ, मसाला व वाण सामानाची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.
शासन नियमानुुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मच्छिमारी करण्यास बंदी होती. या बंदीचा कालावधी शनिवारी संपत असून, रविवारपासून खोल समुद्रात जाण्यासाठी समुद्र किनारी होड्या सज्ज झाल्या आहेत.
रोजीरोटी सुरू होणार असल्याने मच्छिमार बांधवांमध्ये आनंदी वातावरण दिसत आहे. रविवारपासून मासेमारीसाठी मुभा असली तरी खोल समुद्रात जोरदार वारे सुरू असल्याने मुरूड तालुक्यातील बहुतांशी होड्या 6 ऑगस्टपासून मासेमारीसाठी जाणार असल्याचे कळते.
मुरुड तालुक्यातील शिवाजीनगर कोळीवाड्यासह एकदरा, आगरदांडा, राजपुरी, मजगाव, बोर्ली, कोर्लई, नांदगाव आदी किनारपट्टीवरील सुमारे 650 लहान मोठ्या यांत्रिकी बोटी असून, मच्छिमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छिमार सज्ज झाले असल्याची माहिती रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली.
सध्या बोंबील, कोळंबी, जवळा या मासळीचा हंगाम असला तरी नियमित मासेमारी सुरू झाल्यानंतर पापलेट, सुरमई अशा प्रकारची मासळी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मिळू शकते.
एक ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास हरकत नाही. मात्र सध्यातरी किनार्याच्या जवळपास मासेमारी करणे हिताचे ठरणार आहे. मच्छिमारांनी वार्याचा अंदाज घेऊन सुरक्षित मासेमारी करावी.
-तुषार वाळुंज, मत्स्यविकास व परवाना अधिकारी, मुरूड