Breaking News

ढगाळ वातावरणामुळे ताडी निर्मितीवर परिणाम

परवाना शुल्क माफ करण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

लांबलेला पाऊस व चक्रीवादळ यामुळे असलेले ढगाळ वातावरणाचा ताडी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ताडी निर्मिती थांबली आहे. त्यातच राज्य शासनाने ताडीमाडीच्या लिलावाला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली असल्यानेे ताडीमाडी उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे  लागत आहे. त्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचे परवाना शुल्क माफ करावे, तसेच आगामी काळातील शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी जिल्हा ताडी परवानाधारक संघटनेने केली आहे.

लांबलेला पाऊस व चक्रीवादळ यामुळे ताडीसाठी पूरक वातावरण नाही. शिंदीमधून ताडी काढण्यासाठी किमान 10-15 दिवस कडक उन पडावे लागते. ढगाळ वातावरण कायम असल्याने ताडी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

रायगड जिल्ह्यात मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग या तालुक्यामध्ये ताडीमाडीचे उत्पादन घेतले जाते. येथील माडीला मुंबईत चांगली मागणी आहे. दरवर्षी 1सप्टेंबर ते 30 ऑगस्ट अशा बारा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ताडी परवाना देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात येतात. ही प्रक्रिया दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित असते. यंदाच्या वर्षी राज्यभरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका तसेच राज्याच्या किनारपट्टीला बसलेल्या चक्रीवादळाचा तडाखा यामुळे लिलाव प्रक्रिया होऊ शकली नाही. उत्पादन शुल्क विभागाने प्रथम सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत व त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांकरिता 31 डिसेंबपर्यंत मुदत वाढ दिली. परंतु त्यानंतर परवाना घेताना मागील महिन्याचा परवाना शुल्क गेल्या वर्षीच्या अनुषंगाने आकारण्यात आला आहे.

शासनाचे आदेश आल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत परवाना शुल्क  आकारणी प्रक्रिया पूर्ण होईल. तोपर्यंतचे शुल्क देणे गरजेचे आहे. या दरम्यान त्याना ताडीचे उत्पादन घेण्याचीही अनुमती आहे.

-सीमा झावरे, जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अलिबाग

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply