कर्जत : बातमीदार
नेरळ-माथेरान घाट मार्गात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून, त्या नॅरोगेज ट्रकवर आल्या आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून धावणारी मिनीट्रेन पावसाळी सुटीनंतरही काही काळ सुरू होण्याची शक्यता नाही. दरम्यान, या कालावधीत मिनिट्रेनची सध्या बंद असलेली शटल सेवा सुरू करण्यासाठी माथेरान येथे कारशेड उभारण्याची गरज निर्माण झाली असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
मिनीट्रेन सेवा दरवर्षी पावसाळ्यात 15 जून पासून 15 ऑक्टोबर या कालावधीत बंद असते, मात्र या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान-नेरळ नॅरोगेज मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. एका ठिकाणी तर नॅरोगेज मार्ग दिसत नाही, एवढा मोठा मातीचा ढिगारा येऊन पडला आहे. काही ठिकाणी रूळाखालील माती वाहून गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात बंद असलेली मिनीट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी मोठे काम करावे लागणार आहे. त्यासाठी मिनीट्रेनची सेवा सहा महिने बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे.
सध्या बंद असलेली शटल सेवा सुरू ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. दुरुस्तीची लहानसहान कामे करण्यासाठी माथेरान किंवा अमनलॉज परिसरात कारशेड उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामाकरिता पाच कोटी रुपयांची आवश्यकता असून या निधीची मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे.
नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून माती आणि दगड ट्रॅकवर आले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार आहे. या कालावधीत शटल सेवा कायम सुरू राहावी, असा प्रयत्न राहणार असून त्याकरिता लागणार्या निधीची मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे. -ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल