Breaking News

वंजारपाडा-देवपाडा मार्गाची दुरवस्था

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. पोशिर परिसरातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी नेरळला जावे लागते. त्यांना नेरळपर्यंत पायी प्रवास करणे शक्य नसल्याने ते  टमटम किंवा रिक्षाचा वापर करतात, मात्र वंजारपाडा- देवपाडा-वारे या रस्त्याचा काही भाग इतका खराब झाला आहे की तेथून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यावर दुचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. वेडीवाकडी वळणे, चढउतार व उखडलेल्या खडीमुळे रिक्षाचालक या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवासी वाहतूक करतात. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी पोशिर ग्रुप ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे, मात्र जिल्हा परिषदेने अपुरा निधी मंजूर केल्याने रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे.

या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदकडे अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव दिला आहे. मंजूर असलेल्या निधीमध्ये काही मीटरपर्यंत रस्ता होऊ शकतो, परंतु पूर्ण चार किलोमीटर रस्त्यासाठी आणखी अनुदानाची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पोशिर, ता. कर्जत

लवकर रस्ता न झाल्यास आम्ही होणार्‍या अपघातांना शासनाला जबाबदार धरून त्यासाठी मोर्चे काढू व संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यास भाग पाडू.

-रमेश राणे, ग्रामस्थ, देवपाडा, ता. कर्जत

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply