Breaking News

पालीत रस्ता सुरक्षा अभियान

विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली जनजागृती

पाली : प्रतिनिधी

पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पाली पोलीस ठाणे, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल आणि शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय यांच्या सौजन्याने मंगळवारी (दि. 14) पालीमध्ये रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पाली पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षा याबाबत मार्गदर्शन व प्रबोधन केले. रायगड जिल्ह्यात 11 ते 17 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालीतील शेठ ज. नौ. पालिवाला महाविद्यालयातील एनएसएस युनिटच्या वतीने  गावातील चौकात व मुख्य बाजारपेठेत रस्ता सुरक्षेसंबंधी पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली. पादचार्‍यांनी रस्ता ओलांडताना घेण्याच्या खबरदार्‍या, दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट लावण्याचे महत्त्व या पथनाट्यातून विशद करण्यात आले. वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्याने होणारे अपघात, कमी वयोमानाच्या व्यक्तीने वाहन चालवल्याने होणारे अपघात, कधी अशा अपघातात प्राण गमवावे लागतात, तर कधी कायमचे अपंगत्व येते. ते टाळण्यासाठी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे, आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे  सांगण्यात आले. या वेळी शालोम मोटार ट्रेनिंग स्कूलचे मालक नोएल चिंचोलकर, उपप्रादेशिक अधिकारी मयूर भासेकर, अनिल भादवन, राकेश पाटील, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, प्रा. डॉ. अंकुश सोहनी आदींसह वाहतूक पोलीस कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply