Breaking News

‘एल्फिन्स्टन’चे नामांतर काळाची गरज!

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाविद्यालयाला द्यावे!

भारतावर इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले आणि हजारो वर्षांच्या आपल्या प्रथा, परंपरा, संकेत यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न करून आपल्या अर्थातच ब्रिटिशांच्या पाऊलखुणा उमटविल्या. त्या इतक्या घट्ट बसल्या आहेत की त्या खरवडून खरवडूनसुद्धा जाता जात नाहीत. ब्रिटिशांनी आपल्याला बर्‍याच देणग्या देऊन ठेवल्या आहेत की त्या आपल्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पावलोपावली दिसताहेत. ब्रिटिशांनी असंख्य चांगल्या गोष्टी केल्या आहेत, पण ते करताना आपल्या दिग्गज विद्वान गुणवंत अशा महानुभावांनी तन-मन-धनाने सहकार्य केले म्हणून काही गोष्टी नावारूपाला येऊ शकल्या आहेत.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ आणि उपाध्यक्ष कृष्णाभाऊ शेवडीकर या ’राम-लक्ष्मण’सम जोडीने नुकताच एक कार्यक्रम घेतला. मुंबईतील फोर्ट विभागात जहांगीर आर्ट गॅलरीसमोर एल्फिन्स्टन महाविद्यालय आहे. 1835 साली मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून काम करीत होते आणि दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांच्यासारख्या दिग्गज नामवंतांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी शिक्षण दिले. याचाच अर्थ बाळशास्त्री किती मोठे होते हेच दिसून येते. रवींद्र बेडकीहाळ म्हणजे मी तर म्हणेन की बाळशास्त्री जांभेकर यांचे ते पत्रकारितेतील खरे वारसदार आहेत. बेडकीहाळ यांच्या नसानसांत बाळशास्त्री भिनलेले आहेत. पोंभूर्ले या बाळशास्त्री यांच्या जन्मगावी दरवर्षी ते कार्यक्रम करतातच, किंबहुना तिथे बाळशास्त्रींचे भव्य स्मारक उभे करण्यासाठी ते धडपडत आहेत. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी कागलकर यांना बेडकीहाळ यांनी एक पत्र देऊन या महाविद्यालयात असलेल्या ग्रंथालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणी केली. बाळशास्त्री यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एशियाटिक लायब्ररी या मध्यवर्ती ग्रंथालयातही बाळशास्त्री यांचे तैलचित्र समारंभपूर्वक लावण्यात यावे, अशी मागणी बेडकीहाळ यांनी केली आहे. 

या कार्यक्रमासाठी जमलेल्या मान्यवरांसमोर चर्चेत मुद्दा मांडताना त्यांनी सांगितले की, खरं म्हणजे या महाविद्यालयाचे नावच जर ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर महाविद्यालय’ असे केले तर? पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड या स्थानकाचे नाव दादर-प्रभादेवीच्या परिसरात असलेल्या शंभर वर्षे जुन्या अशा प्रभादेवी या देवीच्या मंदिरावरून देण्यात आले. सँडहर्स्ट रोड, रे रोड अशा स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे. 1995 साली युती सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. एकनाथराव खडसे यांच्या एदलाबादचे मुक्ताईनगर झाले. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने नामांतराचा धडाका लावला. त्यापूर्वी मायावती यांनी आपल्या महाराष्ट्रात येऊन कोल्हापूरचे छत्रपती शाहू नगरी आपल्याच नाकावर टिच्चून करून दाखविले. अशा वेळी आपण एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे नाव ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर महाविद्यालय’ असे करायला अडचण काय? महाराष्ट्रात असलेल्या सर्वच पत्रकार संघटनांनी एकमुखाने ही मागणी सरकार दरबारी करणे आणि ब्रिटिशांच्या पाऊलखुणा पुसून आपला जाज्ज्वल्य स्वाभिमान दाखवून देणे ही काळाची गरज आहे.

या चर्चेनंतर मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिनिधी आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष महेश पावसकर यांनी मंत्री उदय सामंत, रवींद्र बेडकीहाळ, कृष्णाभाऊ शेवडीकर, विजय मांडके, दिलीप सपाटे, यदुनाथ जोशी व दस्तुरखुद्द डॉ. माधुरी कागलकर यांच्यासमोर ही सूचना जाहीर भाषणात मांडली. अभ्यासक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या धड्याचा समावेश करण्यात यावा, असेही सुचविले. मंत्री उदय सामंत यांनी हा धोरणात्मक निर्णय आहे, असे जरी सांगितले तरी उच्च व तंत्रशिक्षण खाते त्यांच्याकडेच आहे व या खात्यामार्फत प्रस्ताव मागवून तो मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेणे सहज शक्य आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे समर्थन देऊ शकतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः पत्रकार, छायाचित्रकार असल्याने त्यांनीसुद्धा ही मागणी सहजपणे मंजूर करायला हवी.

सर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पुणे येथील पेशव्यांच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते. नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या काळात त्यांनी मुंबईत भारतीय जनतेसाठी विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. त्यांच्या नावाने एल्फिन्स्टन महाविद्यालय उभे राहिले. याच महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून विद्यार्जनाचे काम हाती घेतले. आताच्या सिंधुदुर्ग, पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे 20 फेब्रुवारी 1812 रोजी जन्मलेल्या बाळशास्त्री यांचे आयुष्य फार थोडे होते, परंतु 20 फेब्रुवारी 1812 ते 18 मे 1846 एवढ्या कमी कालावधीत त्यांनी हिमालयाएवढे उत्तुंग कार्य केले. 1834 साली एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून बाळशास्त्रींची नियुक्ती करण्यात आली. मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक या भाषांचे ज्ञान त्यांना होते. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरू करून बाळशास्त्रींनीच मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. प्राचीन लिपी अभ्यासात घेऊन कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोध निबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी सर्वप्रथम वाचकांच्या हाती दिली.

मुंबई इलाख्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून तत्कालीन सरकारने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केली. अशा बाळशास्त्री यांचे नाव जर एल्फिन्स्टन महाविद्यालयाला देण्यात आले, तर ती त्यांची चिरंतन स्मृती ठरेल. एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकलेल्या किमान 50 मान्यवरांच्या नावांवर जर दृष्टिक्षेप टाकला तरी आपण या मागणीला उचलून धरण्यात स्वतःला धन्य मानू. दादाभाई नौरोजी, खुर्शेदजी रुस्तमजी कामा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, महादेव गोविंद रानडे, फिरोजशहा मेरवानजी मेहता, जमशेटजी नुसेरवानजी टाटा, दिनशा एडल्जी वाच्छा, बद्रुद्दिन तैयबजी, काशिनाथ त्र्यंबकजी तेलंग, नारायण गणेश चंदावरकर, जीवनजी जमशेटजी मोदी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, चिमणलाला हरीलाल सेटलवाड, भुलाभाई जीवनी देसाई, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, मुकुंद रामराव जयकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, चिंतामणराव (सी. डी.) देशमुख, माधव आपटे, होमी भाभा, यशवंतराव (वाय. व्ही.) चंद्रचूड, ए. एस. वैद्य, पी. पी. भगवती, सुलभा पाणंदीकर, चित्रा नाईक, सुजाता मनोहर, सुमा चिटणीस, अजित वाडेकर, स्वरूप संपत, भरत दाभोळकर, मीना नाईक, रत्नाकर मतकरी, नीना कुलकर्णी, सोनल मानसिंग, अबू जानी, मनीष मल्होत्रा, रणजित होस्कोटे, कुणाल गांजावाला, संजय बहादूर, अनिश प्रधान, मिलिंद वागळे, रामदास भटकळ, भक्ती बर्वे, किशोरी आमोणकर, एच. एम. सीरवई, जी. एस. घुर्ये, जेरी पिंटो, माणेक डावर, विजय मर्चंट अशा दिग्गजांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेतले व तेही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी विद्यार्जनाच्या कार्यास प्रारंभ केल्यानंतर. मग अशा वेळी या महाविद्यालयाला आचार्य बाळशास्त्री यांचे नाव देणे सर्वार्थाने योग्य ठरेल. बाळशास्त्रींचे भव्य स्मारक जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु एल्फिन्स्टन महाविद्यालयाला त्यांचे नाव देणे ही तर आपल्या, महाराष्ट्र सरकारच्या दृष्टिपथातील, आवाक्यात असलेली बाब आहे. आजची ही काळाची गरज आहे. सर्वच पत्रकारांनी, पत्रकारांच्या सर्व संघटनांनी यासाठी कंबर कसली पाहिजे. रवींद्र बेडकीहाळ, कृष्णाजी शेवडीकर, दिलीप सपाटे, यदुनाथ जोशी, नरेंद्र वाबळे, कमलेश सुतार आदी मान्यवर पत्रकार नेतेमंडळींनी यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा!

-योगेश त्रिवेदी (9892935321)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply