नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर खर्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने उग्र राष्ट्रवादावर भर दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. तुम्ही माझे कुठलेही भाषण ऐका. त्यात जास्त भर विकासाच्या मुद्द्यावर आहे, पण ते मुद्दे माध्यमांकडून ठळकपणे अधोरेखित केले जात नाहीत. अनेक दशकांचा दहशतवाद आणि आपल्या सैनिकांचे मृत्यू हे खरे मुद्दे नाहीत का? असा सवाल करतानाच देशभक्ती हा आजार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताच्या मूळ संस्कृतीवर हल्ला करण्यासाठी ज्याप्रमाणे उग्र धर्मनिरपेक्षतेचा शोध लावण्यात आला त्याचप्रमाणे देशभक्तीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यासाठी उग्र राष्ट्रवादाचा शोध लावला गेला, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विचार मांडले. पुन्हा एकदा जनतेचा आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘चलता है’ या वृत्तीमुळे दीर्घकाळ आपल्या देशाची प्रगती खुंटली. मी या गोष्टीला आव्हान देत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, मुळात आज विरोधकांकडे आमच्या विरोधात मुद्देच उरलेले नाहीत. आमचे साध्य एकच आहे ते म्हणजे सगळ्यांचा विकास.