कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंपैकी 27% मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात आणि स्तनांचा कर्करोग, कोलोरेक्टल (मोठ्या आतडे) कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग या तीन प्रामुख्याने आढळणार्या कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. पूर्वी हा रोग केवळ वृद्ध व्यक्तींना होत असे पण आता कमी वयातही या रोगाचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. पुरुषांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळत असला तरी महिलांनाही हा आजार होतो.
फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी धुम्रपान हे प्रमुख कारण आहे. या शिवाय प्रदूषण, कामाच्या ठिकाणी असलेले अॅस्बेस्टॉस, टार, काजळी, आर्सेनिक, निकेल, रेडिएशन इत्यादी घटक, जनुकीय बदल ही धुम्रपान न करणार्या व्यक्तींना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची कारणे आहेत. फुफ्फुसांना होणार्या कार्सिनोमासाठी खोकला हे महत्त्वाचे लक्षण आहे. धुम्रपान करणार्या व्यक्तीस खोकला झाला असेल आणि औषधे घेऊनही दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बरा होत नसेल तर फुफ्फुसांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. धाप लागणे, खोकल्यातून रक्त बाहेर पडणे, सतत निमोनिया होणे ही सुद्धा या कर्करोगाची लक्षणे आहेत. काही वेळा छातीच्या पटलाला वेदना होणे, आवाज घोगरा होणे किंवा उचक्या लागणे हीसुद्धा लक्षणे असतात. काही रुग्णांमध्ये बोन मेटास्टेसिसमुळे (कर्करोग झाल्यामुळे दुसर्या अवयवात होणारी गाठ) पाठदुखी होते, इतर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
फुफ्फुसांचा कर्करोग हा छुपा सैतान असतो. मध्यमवयीन किंवा वृद्धांनी याच्या शक्यतेचे जास्त असलेले प्रमाण लक्षात घेतले तर छातीच्या एक्स-रे सारख्या चाचण्या नियमितपणे केल्या तर सुरुवातीच्या टप्प्यावर या कर्करोगाचे निदान होते. लंग कार्सिनोमा झालेल्या व्यक्तीचा जीव वाचणे हे कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असते. फुफ्फुसाचा कर्करोग पहिल्या टप्प्यावर असेल तर जीव वाचण्याचे प्रमाण जवळपास 92% असते आणि कर्करोग चौथ्या टप्प्यावर पोहोचला असेल तर हेच प्रमाण 4-10% इतके आहे.
कर्करोगावर उपचार करण्यासाठी अनेक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. आपल्या उपलब्ध अवजारांमध्ये शस्त्रक्रिया(ओपन, व्हीएटीएस, रोबोटिक), केमोथेरपी, रेडियोथेरपी आणि टारगेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी या उपचारपद्धतींचा समावेश आहे. चौथ्या टप्प्याचा फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या काही व्यक्ती टारगेटेड टॅब्लेट थेरपीमुळे अधिक काळ जगतात.
या घातक आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे आणि वेळेवर उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण अधिक काळ जगू शकेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या छुप्या सैतानाला वेळीच ओळखायचे असेल तर आपल्याला या आजाराचे संशय येण्याचे प्रमाण वाढले पाहिजे आणि वेळेवर तपासण्या आणि उपचार केले पाहिजेत.
-डॉ. प्रिया एशपुनियानी, सल्लागार ऑन्कोसर्जन एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट, संपर्क – 9820839616