कर्जत : बातमीदार : भाताच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याची गरज असून, गतिशील संकरिकरणासाठी जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत यांनी येथे केले.
कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या 54 व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक गट चर्चेच्या उद्घाटन समारंभात कुलगुरू डॉ. सावंत अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. संकरित भाताचे क्षेत्र एकूण भात लागवड क्षेत्राच्या 10 टक्के पर्यंत वाढविण्याची नितांत गरज असून असे झाल्यास भात शेती फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले.
डॉ संजय सावंत पुढे म्हणाले की, भात पिकाचा जनुकीय आराखडा तयार झाला असून, प्रत्येक जनुकाचे कार्य समजण्यासाठी त्याचा खूप फायदा झाला आहे, म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेल्या जाती निर्माण करण्यासाठी ’जनुक संपादन ’ या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात डॉ. रमेश कुणकेरकर यांनी, बारीक दाण्याचे संकरित वाण विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले. मधुमेह रुग्णांसाठी कमी ’ग्लायसेमिक इंडेक्स ’असलेले भात वाण प्रसारित करण्याची गरज असल्याचे पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माजी संचालिका डॉ इंदू सावंत यांनी सांगितले.
भाताचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या भात जातींमुळे शेतकर्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व वनस्पती विभागाचे प्रमुख डॉ. मुराद बुरोंडकर, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ शिवराम भगत यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. यावेळी कुलगुरूंच्या हस्ते वार्षिक अहवालाचे विमोचन करण्यात आले.
विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गटचर्चेला राज्याचे भात विशेषज्ञ डॉ रमेश कुणकेरकर डॉ. अभय जाधव, डॉ. गौतम श्यामकुवर, डॉ. बाळासाहेब चौधरी, डॉ. मिलिंद मेश्राम, डॉ. हेमंत पाटील, डॉ. एन. व्ही. काशीद, डॉ. के. एस. रघुवंशी, सी. डी. सरवंडे, डॉ. भरत वाघमोडे, डॉ. विजय शेट्ये, खार जमीन शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. दोडके, ए. एस. ढाणे, महेंद्र गवई, भाभा अणू संशोधन केंद्राचे डॉ. बी. के. दास आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते. सहाय्यक भात विशेषज्ज्ञ डॉ. प्रवीण वणवे यांनी आभार मानले.