Tuesday , February 7 2023

जागरूक राहून काम करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्‍यांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्याला 70 टक्के गुण मिळाले तो भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर गेला, तर 40 टक्के गुण मिळालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी मिळून राज्यात सरकार बनविले आहे, मात्र सहा महिने ते एक वर्षाच्या पुढे यांची गाडी जाऊ शकणार नाही, परंतु तोवर ही मंडळी महाराष्ट्राचे वाटोळे लावतील. त्यामुळे जनतेला न्याय मिळून देण्यासाठी आपण जागरूकपणे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पनवेल तालुक्यातील भाजप पदाधिकार्‍यांची बैठक सोमवारी (दि. 9) शहरातील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्षपदावरून बोलत होते. बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, कामगार नेते जितेंद्र घरत, पंचायत समिती सदस्य तथा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भूपेंद्र पाटील, के. ए. म्हात्रे, सुभाष पाटील, महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बावीस्कर, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, राज्यात नवे सरकार अस्तित्वात येऊन इतके दिवस झाले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. ज्यांना मंत्रिपद दिलेे गेले त्यांनाही खाती मिळालेली नाहीत. अशातच ही मंडळी रोज प्रकल्प रद्द करीत आहेत,  स्थगिती देत आहेत. ज्या शेतकर्‍यांचा कैवार यांनी घेतला, त्यांच्यासाठीदेखील काहीच करताना दिसत नाही. यांचे काही खरे नाही. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. कदाचित पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते. राज्याची वाट लागण्यापेक्षा एकवेळ निवडणूक झालेली चालेल. त्यासाठी सज्ज राहावे लागेल.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नेतृत्वाचे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. फडणवीस यांच्यावर ब्राम्हण असल्याची टीका करण्यात आली, मात्र भाजपने कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. उलट सर्वसामान्य, तळागाळातील आणि बहुजन जनतेसाठी फडणवीस यांनी अनेक दूरदर्शी, धोरणी व धाडसी निर्णय घेतले, विविध लोकोपयोगी योजना राबविल्या. मराठा आरक्षणाचा निर्णयही याच फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

पक्षात सध्या संघटनात्मक फेररचना होत आहे असे सांगून आगामी सर्व निवडणुकांसाठी पक्ष मजबूत करू या, असे आमदार ठाकूर शेवटी म्हणाले.

‘हायकल’ आंदोलन तूर्त स्थगित

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल कंपनीने क्षुल्लक कारणे देऊन चार कर्मचार्‍यांना कमी केले आहे. मूजोर कंपनी व्यवस्थापनाला आपल्या तलवारीची धार बघायची असल्यास मागे हटायचे नाही, असा निर्धार आम्ही केलाय. त्यानंतर आम्हाला भूमिका मांडायची आहे, चर्चा करायची आहे असे पत्र या कंपनीचे एचआर प्रेसिडंट यांनी आपल्याला दिले आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला काय होते ते पाहूया. तोपर्यंत आंदोलनास तूर्त स्थगिती देत असल्याचे सांगून त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

…तर नैना प्रकल्प होऊ देणार नाही!

नैना क्षेत्रातील शेतकर्‍यांचे प्रश्न जैसे थे ठेवून सिडको हा प्रकल्प पुढे रेटत असल्याने शेतकर्‍यांचा त्याला विरोध आहे. त्यातूनच या प्रकल्पासंदर्भातील सर्व्हे नुकताच बंद पाडण्यात आला. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये ही भाजपची भूमिका आहे. आता सिडको काही सुयोग्य पर्याय घेऊन येते का ते पाहू. त्या माध्यमातून शेतकर्‍यांचे भले होत असल्यास ते आपली जमीन देतील, मात्र शेतकर्‍यांची जमीन घेऊन त्यांना देशोधडीला लावले जाणार असेल, तर अशा पद्धतीने नैना प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply