‘नेटफ्लिक्स’पूर्व युगातही प्रत्येक दशकातील तरुणाईच्या मनांवर पाश्चात्त्य तारे-तारकांचा प्रभाव होताच. नव्वदीच्या दशकापासून तर तो अमेरिकी टीव्ही मालिकांचाही होता. ल्यूक पेरीची मोहिनी जगभर पोहोचली ती याच काळात. ल्यूक पेरीचा प्रभावकाळ हा हॉलीवूडमधील चॉकलेट हीरो जॉन क्युझॅक, सुपरस्मार्ट नायक जॉर्ज क्लूनी आणि मदनअवतारी ब्रॅड पिट यांना समांतर, मात्र टीव्ही मालिकांसारख्या दुसर्या प्रवाहात झळकूनही या अभिनेत्याची छबी नव्वदीच्या दशकातील सर्वाधिक मासिकांच्या मुखपृष्ठांवर मुख्य धारेतील नायकांसारखी वारंवार छापून येत असे. ‘बेव्हर्ली हिल्स, नाइन झीरो टू वन झीरो’ या मालिकेत त्याने वठविलेल्या अग्रेसर तरुणाची भूमिका अफाट गाजली. अतिश्रीमंत बापाच्या मद्यपी पोराची ही सूडगाथा जगभर निर्यात झाली अन् त्या मालिकेचा सारा डोलारा ल्यूक पेरीने उभा केला. 10 वर्षांत सुमारे 300हून अधिक एपिसोड्सद्वारे ल्यूक पेरीने आपल्याभोवती अफाट वलय तयार केले होते. सत्तरीच्या दशकात आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे ल्यूकचे स्थलांतर झाले. बांधकामाचे कंत्राट घेणार्या सावत्र बापाच्या घरात काही काळ राहिल्यानंतर त्याने अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी न्यूयॉर्क गाठले. चेहरा, हिंमत आणि उत्साह यांच्या बळावर बांधकाम मजुरापासून ते दारांच्या बिजागर्या-कड्या बनविणार्या फॅक्टरीमध्ये न लाजता काम केले. हे काम सुरू असतानाच विविध स्टुडिओंना हेलपाटे घालत 250च्या वर ‘ऑडिशन्स’मधून साभार परतीचे अनुभव घेतले. तरीही चिवटपणा न सोडल्याने दुय्यम बॅण्ड्सच्या म्युझिक व्हिडीओजमध्ये शेजारी वगैरे उभे राहण्याचे काम त्याला मिळू शकले. ‘बेव्हर्ली हिल्स’ने त्याच्या श्रमाची सारी फळे त्याला मिळू लागली. ‘व्हॅनिटी फेअर’पासून सर्व नियतकालिकांत त्याच्या 10-20 पानी दीर्घ मुलाखती छापून येऊ लागल्या. एमटीव्ही, इंडिपेण्डण्ट सिनेमा अशा नव्या पर्यायी मनोरंजनाच्या त्या काळातही, देखणेपणा आणि अभिनयाच्या बळावर ल्यूक पेरीने आपले स्थान टिकवले. ल्यूक पेरीबाबतची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याची तुलना 60च्या दशकातील हॉलीवूडच्या जेम्स डीन या अभिनेत्याच्या सौंदर्याशी केली जात असे. ल्यूक पेरी याचे या आठवड्यात आकस्मिक निधन झाले.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …