पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. स्वतः पवार यांनी पुण्यात सोमवारी (दि. 11) झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी शरद पवार तिथून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती, मात्र लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अचानक पवारांच्या उमेदवारीबद्दल पक्षात फेरविचार सुरू झाला. अखेर पवारांनी आपला निर्णय फिरविला आहे. त्यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबीयांतील तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.
शरद पवारांना बदलत्या हवेचा अंदाज लवकर येत असतो. त्यानुसार त्यांनी सध्याचे राजकीय वातावरण पाहून माघार घेतली, हा भाजप व मित्रपक्षांच्या युतीचा विजय आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार?
मुंबई : वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास त्यांची टक्कर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी होणार असून, त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी सोमवारी (दि. 11) तसे संकेत दिले.