राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या एकापाठोपाठ घटना समोर आल्या आहेत. क्षुल्लक कारणावरून मुली-महिलांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारांनी अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सर्व स्तरातून संवेदना आणि संताप व्यक्त होतोय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी विकृतीला वेळीच ठेचले गेले पाहिजे. त्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत ही तरुणी सुमारे 40 टक्के भाजली असून, तिच्या चेहरा व श्वसन यंत्रणेवर परिणाम झाल्याने ती सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. विकेश नगराळे या विकृताने हे कृत्य केले. या विकेशचे लग्न झालेले असून, त्याला एक तान्ही मुलगीदेखील आहे. त्यामुळे त्याचे प्राध्यापक तरुणीवर प्रेम होते, असे म्हणणेच मुळात चुकीचे आहे. हे प्रेम नाही, तर पाप आहे. ते करताना त्याने किमान स्वत:च्या लहानग्या मुलीचा तरी विचार करायला हवा होता, पण विवेक हरविलेल्याकडून काय अपेक्षा करणार?
दुसर्या घटनेत औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील महिलेला पेटवून देण्यात आले. तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी संतोष मोहितेने या 50 वर्षीय महिलेच्या घरात घुसून अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. यामध्ये ही महिला 95 टक्के गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तिची प्राणज्योत मालवली. पीडिता आणि आरोपी यांच्यात संबंध होते, असे म्हटले जात आहे. या दोघांमध्ये संबंध असले तरी तिला जाळण्याचा अधिकार त्याला कुणी दिला, हा प्रश्न उपस्थित होतो.
वर्धा, औरंगाबादनंतर पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या 55 वर्षीय महिलेला विवस्त्र करून जाळून फासावर लटकविल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालातही महिलेचा मृत्यू गळफासाने झालेला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण राखून ठेवण्यात आले आहे. लवकरच ते समोरही येईल, मात्र मंगळसूत्रावरून झालेला वाद मृत्यूपर्यंत जातो, हे दुर्दैवी नव्हे तर काय?
एकेकाळी चूल आणि मूल यामध्ये गुरफटलेली स्त्री एव्हाना पुरुषाच्या बरोबरीने विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. काही ठिकाणी तर महिला नेतृत्वही करीत आहेत. असे असताना महिलावर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदलला नसल्याचे दिसून येते. नव्हे तर त्यांना सहजपणे लक्ष्य केले जाते. एकीकडे महिला आपल्या यशाचे झेंडे नवनव्या शिखरावर रोवत असताना दुसरीकडे मात्र महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होताना पाहावयास मिळत आहे.
दिल्लीतील ज्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणाने सारा देश हलला त्या घटनेतील आरोपींना सात वर्षांनंतरही शिक्षा झालेली नाही. या प्रकरणातील जिवंत असलेल्या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली असून, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे, पण त्यासाठी झालेला विलंब न्यायालयीन व्यवस्था सुधारण्यास किती वाव आहे हे दर्शवितो. जलदगती न्यायालयातील (फास्ट ट्रॅक) खटल्याची ही गत असेल, तर सर्वसाधारण खटल्यांची केवळ कल्पनाच केलेली बरी.
न्यायालयीन यंत्रणेबरोबरच ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस खात्याच्या कामकाजात बदल होणे अपेक्षित आहे. मुलुंड रेल्वेस्थानकात एका विकृताने तरुणींचा विनयभंग केल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे दिसत असतानाही कुणी तक्रार दिली नाही म्हणून गुन्हा दाखल होत नसेल, तर अवघड आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे, जेणेकरून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे त्यांना शक्य होईल.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडत असताना आता सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. एखादी भयंकर घटना घडली की जनभावना तीव्र होतात. आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली जाते. त्यानुसार सरकारकडून आश्वासनही दिले जाते. कालांतराने संबंधित विषय मागे पडतो आणि पुढील भयंकर घटना घडेपर्यंत सारेकाही आलबेल असते. त्यामुळे नवी विकृती निर्माण होते. म्हणूनच आज ‘सावित्रीच्या लेकी’ असुरक्षित आहेत. त्यांना सुरक्षितपणे जीवन जगता यावे यासाठी लोकनियुक्त सरकारनेच पुढाकार घेऊन पोलीस, न्यायालय, स्वयंसेवी संस्था-संघटना यांना एकत्र आणून मार्ग काढणे काळाची गरज बनली आहे.
-समाधान पाटील, अधोरेखित