Breaking News

रोह्यात सुसज्ज रुग्णालय उभारा; नागरिकांची मागणी; उपचारासाठी गाठावे लागतेय मुंबई, पुणे, पनवेल

रोहे : प्रतिनिधी

रायगड जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रोहा तालुक्यात वाढते नागरीकरण व तालुक्यात असलेले दोन औद्योगिक क्षेत्र पहाता तालुक्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत आहे. या सर्व बाबीला पुरक असलेले नागरिकांचे व कामगारांचे आरोग्य मात्र रामभरोसे आहे. प्राथमिक उपचाराच्या व्यतिरिक्त अन्य उपचारासाठी नागरिकांना मुंबई, पुणे, पनवेल गाठावे लागत आहे. विकासाच्या व तिसर्‍या मुंबईचे प्रवेशव्दार असलेल्या रोह्यात सुसज्ज रुग्णालय नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, आणि राज्य शासनाने सुसज्ज रुग्णालय उभारावे, अशी मागणी रोहेकर नागरिक व तरुण करित आहेत.

रोह्यातील नागरिकांनी एकत्र येत उभे केलेले संजय गांधी रुग्णालय आज बंद पडले आहे. हे रुग्णालय चालु व्हावे ही रोहेकरांची मागणी आहे. यासाठी प्रयत्न ही चालु झाले. परंतु का प्रयत्न थांबले हे मात्र समोर येत असताना अनेक तर्क वितर्कात अडकले आहे. रोहा उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले. 52 खाटाचे रुग्णालयाचे इमारत उभी राहीली. परंतु या रुग्णालयासाठी आवश्यक बाबी आद्याप रुगणालयापासून दुरच आहेत. रुग्णालयातील सोयीसुविधांचे काय ? रोहा शहरातील या शासकीय रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर इमारत उभी झाली, काही खाटा वाढल्या. पण अन्य सोयीसुविधा नसल्याने एखाद्या महिलेची सिझेरियन प्रसूती करायची असली तरी अलिबाग जिल्हा रुग्णालयात

हलविण्यात येते.

सर्प किंवा विंचू दंश झाल्यास संबंधित रुग्णाला आवश्यक असणारी शाश्वत यंत्रणा नसल्याने अलिबागला जावे लागते. या रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नाहीत. लोकांच्या उद्रेकानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून डॉक्टर पाठवण्यात येतात. काही दिवसांनी सदर डॉक्टर निघून गेलेले असतात. शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. आता काही डॉक्टर आपल्या परीने सेवा देत आहेत. परंतु स्पेशलिस्ट डॉक्टर नाहीत. उपलब्ध डॉक्टर, नर्सेस त्यांच्या परीने आरोग्य सेवा चांगली देत आहेत. केवळ इमारती उभारून आरोग्य यंत्रणा सुधारणार नाहीत. त्यासाठी तज्ञ डॉक्टर त्याचप्रमाणे एक्स रे मशीन, ईसीजी, रेस्पिरेटरी सिस्टीम अशा अद्यावत प्राथमिक गोष्टी देखील उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात असणे आवश्यक आहे. जे उपलब्ध आहे. त्यांची दुरुस्ती, क्षमता या बद्दल असे अनेक प्रश्न समोर नेहमीच येतात. 

एकमुखी सूर तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व 21 उप आरोग्य केंद्र यांची अवस्था देखील वाईट आहे. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेले रासायनिक कारखाने, मुंबई-गोवा महामार्गावर होणारे अपघात पाहता रोहा तालुक्याला सुसज्ज अशा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे स्थानिक जनता, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार सुचविले आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी असा एकमुखी सूर व्यक्त होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply