
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2020निमित्ताने पालिका क्षेत्रातील अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांनी लोकशाही पंधरवडा-लोकशाही, निवडणूक आणि सुशासन चर्चासत्रात उपस्थित राहून सहभाग नोंदवला. सर्व सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांनी स्वतः व संस्थेच्या वतीने केल्याला कामांची माहिती चर्चासत्र सुरू होण्यापूर्वी विस्तृतपणे दिली. यानिमित्ताने लोकशाही सुदृढ व बळकट करण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले. लोकशाही, सुशासन आदींसह महत्त्वाच्या विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या वतीने पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सामाजिक संस्थांच्या जबाबदार्या व कर्तव्याची जाणीव करून देताना निवडणुकीदरम्यानच्या जबाबदार्या आणि तत्त्वे विषद करून सांगितले की, चांगल्या उमेदवारांना निवडून दिले, तर ते नागरिकांच्या समस्या सभागृहात चांगल्या प्रकारे मांडू शकतील तसेच समाजोपयोगी कामांना प्राधान्य देऊन ती सोडवतीलही. उपस्थित सर्व सामजिक व सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींना लोकशाही पंधरवडा लोकशाही, निवडणूक आणि सुशासन बैठकीला उपस्थित राहून चर्चासत्रात सहभागी झाल्याबद्दल सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.