महाराष्ट्राचे संघ बाद फेरीत
रोहतक : वृत्तसंस्था
हरियाणातील रोहतक येथे चालू असलेल्या 46व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्राच्या मुलांनी पाँडेचरीला, तर मुलींनी आपल्याच विदर्भ संघाला चितपट करीत आगेकूच केली.
महाराष्ट्राच्या मुलांनी साखळीतील पहिल्या सामन्यात पाँडेचरीचा 57-25 असा सहज पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत 26-11 अशी आघाडी घेणार्या महाराष्ट्राने उत्तरार्धातदेखील जोशपूर्ण खेळ करीत प्रतिस्पर्ध्यावर चार लोण चढवत गुणांचे अर्धशतक पार केले. महाराष्ट्राच्या तेजस पाटीलने 12 चढाया करीत 8 गुण घेतले व 5 पैकी 3 पकडी यशस्वी केल्या. परेश हरडने 11 चढायांत 9 गुण मिळवले व 2 यशस्वी पकडी केल्या. वैभव गर्जेने 3 पकडी घेतल्या. हर्ष लाडने 2 पकडी करीत त्यांना बरी साथ दिली.
सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलांनी मध्य प्रदेशला 54-31 असे नमवत दुसर्या विजयाची नोंद केली. प्रतीक चव्हाणने एका चढाईत मध्य प्रदेशचे 4 गडी टिपत लोण दिला आणि येथूनच सामना महाराष्ट्राच्या बाजूने एकतर्फी झुकला. आकाश चव्हाणने 24 चढाया करताना 20 गुण मिळवत सामन्यावर ठसा उमटवला. प्रथमेश निघोटने 10 पैकी 6 यशस्वी पकडी केल्या, तर प्रतीक चव्हाणने चढाईत उत्तम साथ दिली. मध्य प्रदेशकडून भानू, अनुपम सिंग यांनी बर्यापैकी लढत दिली.
महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाचा 60-12 असा धुव्वा उडवला. मानसी रोडेने 16 चढायांत 13 गुण, हरजितकौर संधूने 12 चढाया करीत 8 गुण आणि एक पकड यशस्वी केली.