Breaking News

आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ व्हावे!

आठवड्याच्या लेखाचं टंकलेखन करायला बसलो आणि माझा भ्रमणध्वनी खणखणला. मी त्याचा सुहास्यवदनाने स्वीकार केला. समोरची व्यक्ती बुजुर्ग असल्याचे जाणवले. ते बोलत होते, आपण योगेश वसंत त्रिवेदी कां? मी म्हटलं, होय! आपण? मी मनोहर जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वंशज. मी आपला लेख वाचला, आपले अभिनंदन. आपण एल्फिन्स्टन महाविद्यालयाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर याचे नाव देण्याची सूचना केली आहे. सूचना चांगली आहे, पण आपण बाळशास्त्री जांभेकर यांना लहान करताय; कारण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अल्पकालीन आयुष्यात फार मोठे कार्य आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघरपर्यंतच्या कोकण पट्ट्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्वतंत्र विद्यापीठ ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ’ या नावाने स्थापन करावे. नाहीतरी मुंबई विद्यापीठाचे विभाजन करुन कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ बनवावे, अशी तयारी  सुरू आहे. मग हेच कोकण विद्यापीठ ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ’ या नावाने सुरू करावे. मनोहरराव जांभेकर यांची सूचना खरोखरीच सर्वोत्तम अशीच असून ही सूचना अंमलात आणली गेली तर समस्त कोकणवासीयांना, तसेच तमाम मराठी वृत्तपत्रसृष्टीला निश्चितच अभिमान वाटेल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण आदी मान्यवर नेतेमंडळीसुद्धा या सूचनेला समर्थन देतील अशी खात्री आहे.

मनोहरराव जांभेकर यांचे पिताश्री हे पोंभूर्ले येथून चिपळूण येथे कामाच्या निमित्ताने आले. मनोहरराव हे आता चिपळूण येथे स्थायिक असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे कार्य आहे. अनेक महाविद्यालये, शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केल्या असून वयाच्या नव्वदाव्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजविणारा आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा ते खर्‍या अर्थाने चालवित आहेत. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी पोंभूर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी जे परिश्रम घेतले किंबहुना घेत आहेत, त्याबद्दलसुद्धा मनोहरराव यांनी त्यांची वाखाणणी करतानाच त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी, अशी मनीषा बोलून दाखविली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष स्वरराज श्रीकांत ऊर्फ राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या स्थापनेच्या 13 वर्षांनंतर गोरेगाव येथील एनएसई संकुलात पहिल्यांदा महाअधिवेशन भरविले. या महाअधिवेशनात हिंदुत्वाचा हुंकार दिला आणि ’प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिताशाहसूनोःशिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते’ या छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा अंकित असलेला भगवा ध्वज महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर मी हा ध्वज आधीपासूनच घेणार होतो, पण आज त्याचे जाहीर अनावरण करीत असल्याचे स्पष्ट केले. अर्थात, हा शिवरायांच्या राजमुद्रेचा ध्वज निवडणुकीत वापरणार नाही, हेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या या ध्वजाला संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेतला असून तो वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जे व्हायचे ते होईल. संबंधित यंत्रणा जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण मराठी ही आपली भूमिका सोडलेली नाही, पण हिंदुत्ववादी भूमिकासुद्धा आपलीच आहे, असे सांगतानाच मराठीला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला, तर मी मराठी म्हणून आणि हिंदुंना कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर हिंदु म्हणून तसेच दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीनेच उत्तर देईन, असे ठणकावून सांगितले. दोन दिवसांच्या औरंगाबाद दौर्‍यावर गेलेल्या राज ठाकरे यांनी औरंगाबाद चे संभाजीनगर करण्यात हरकत काय? असा सवाल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी विधानसभा अधिवेशनात ठराव आणण्याची गर्जना केली.

इथे एका गोष्टीची आठवण मुद्दाम करुन द्यावीशी वाटते. 1995 ते 1999 या काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिवशाही सरकार होते आणि डॉ. मनोहर गजानन जोशी हे मुख्यमंत्री तर गोपीनाथराव पांडुरंग मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. या शिवशाही सरकारने सर्वात पहिला निर्णय घेतला आणि केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी शिफारस केली. हा निर्णय होता ’बॉम्बे’चे ’मुंबई’ करण्याचा. ही शिफारस पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मान्य केली आणि केंद्र सरकारनेसुद्धा ’बॉम्बे’चे ’मुंबई’ असे शिक्कामोर्तब केले. काही अपवाद वगळता आज सर्वत्र बॉम्बे चे मुंबई करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बॉम्बे हायकोर्ट असे असून तेही लवकरच अंमलात येईल, अशी खात्री आहे. शिवशाही सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचाही निर्णय घेतला होता, पण न्यायालयाने तो मान्य केला नाही, असे समजते. विशेष म्हणजे श्रीमान राज ठाकरे हे त्यावेळच्या सरकारच्या अनेक नियंत्रकांपैकी एक नियंत्रक (रिमोट कंट्रोल) होते आणि त्यांना या संपूर्ण बाबींची कल्पना/माहिती आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात आपल्या अनुयायांचे अज्ञान दूर करायला काय हरकत आहे?

राज ठाकरे यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेऊन हे नामांतराचे निर्णय सत्वर मार्गी लावावेत. फडणवीस आणि राज हे पत्रकारांचे मित्र आहेत किंबहुना राज यांना वैभवशाली पत्रकारितेच्या परंपरेचा वारसा लाभला आहे. त्यामुळे त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे 90 वर्षीय वंशज चिपळूण निवासी पोंभूर्लेकर अशा मनोहरराव जांभेकर यांनी केलेली बहुमोल अशी ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ’ ही सूचना उचलून धरावी आणि ती मार्गी लावावी, अशी अपेक्षा! यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

-योगेश त्रिवेदी (9892935321)

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply