उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका रंगणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नववर्षात श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेने भारताच्या मोहिमेची सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये 5 जानेवारीपासून ही मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील विशेषकरून तीन महत्त्वाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहेत. ते खेळाडू म्हणजे लोकेश राहुल, शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह.
श्रीलंकेच्या भारत दौर्याची सुरुवात गुवाहाटीतून होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 7 जानेवारीला इंदोरला, तर तिसरा सामना 10 जानेवारीला पुण्यात होणार आहे. या मालिकेत नजर असणारा पहिला खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. तो सध्या धमाकेदार फॉर्मात आहे. सततच्या अपयशामुळे स्थानिक त्याने काही काळ क्रिकेट सामन्यांत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा खेळ बहरला. विशेषत: टी 20 सामन्यात त्याने सलामीला येत दमदार कामगिरी करून दाखवली. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यामुळे राहुलला सलामीला येण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करीत राहुलने यशस्वी कामगिरी करून दाखवली.
शिखर धवन हा आता तंदुरूस्त असून, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून तो पुनरागमन करीत आहे. नुकतेच त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत शतक ठोकले. त्यामुळे सलामीच्या स्थानासाठी शिखर धवन आणि राहुल यांच्यात स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राहुल आणि धवनव्यतिरिक्त भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तब्बल चार महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक करीत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. तो तंदुरूस्त झाल्यावरही आगामी टी 20 विश्वचषक लक्षात घेता त्याला अतिरिक्त काळ विश्रांती देण्यात आली होती.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर दोघेही दुखापतग्रस्त आहेत. अशा वेळी गोलंदाजीचा भार बुमराहवर असेल. दुसरीकडे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा हा टी 20 मालिकेत श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या या मालिकेत त्याच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे.