संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव : ना. दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिपादन
पनवेल : हरेश साठे
प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेबांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृतीतून विकसित करणारे विधायक संघर्षाचे लोकनायक पाटील सरांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव प्रदान करताना अतिशय आनंद होत असून, हा गौरव स्फूर्ती देणारा आहे, असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी (दि. 29) केले. ते खांदा कॉलनीत झालेल्या विशेष सोहळ्यात बोलत होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब व कष्टकर्यांचे द्रष्टे नेते आणि थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व त्यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनीतील स्वायत्तताप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोठ्या दिमाखात झाला. या सोहळ्यात स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिल्या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सोहळ्याचे संयोजक व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, विशेष अतिथी म्हणून राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, एन. डी. पाटील यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनी पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संजीव पाटील, मीना जगधने, दशरथ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, नगरसेवक सतीश पाटील आदी उपस्थित होते. मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जनार्दन भगतसाहेबांच्या कार्याचा आणि योगदानाचा मी आढावा घेतला. त्यांचे कार्य फक्त आणि फक्त समाजासाठीच होते, तसेच ते महान होते. या सोहळ्याचे संयोजक लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व निवड समितीने आज भगतसाहेबांच्या नावाने जो जीवन गौरव पुरस्कार दिला आहे आणि या पुरस्कारासाठी थोर विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील या समर्थ व्यक्तिमत्त्वाची निवड केली त्याबद्दल त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाटील सरांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी आणि समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी एकरूप झालेल्या पाटील सरांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान होत आहे, हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. समाजातील सर्वसामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी, सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी पाड्यांतील लोकांचे जीवन उंचावण्यासाठी ज्यांचे अविरत कार्य सुरू आहे, त्या पाटीलसाहेबांना आज माझ्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा माझ्या आयुष्यात हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, असे मी मानतो.
ते पुढे म्हणाले की, क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी गावात एका शेतकर्याच्या कुटुंबामध्ये सरांचा 15 जुलै 1929 रोजी जन्म झाला. शाहू-फुले-आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने प्रभावित झालेला हा काळ असताना त्या वेळेला शिक्षण घेताना प्रचंड वाचन, उत्तुंग ध्येयवाद आणि समर्पित जीवन जगण्याची अभिलाषा असलेल्या शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला, जोत्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊन गेला. याच भावनेने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि आयुष्यात तो महत्त्वाचा टप्पा ठरला. आज आपण एन. डी. सरांचे व्यक्तिमत्त्व पाहतो. सरांच्या शिक्षणाचा काळ हा मातृभूमीला पारतंत्र्याच्या साखळदंडातून मुक्त करायचा चळवळीचा काळ होता. वयाच्या 16व्या वर्षी सरांनी आपली नाळ समाजाशी घट्टपणाने जोडली. शंकरराव मोरे संपादक असलेल्या जनसत्ता साप्ताहिकाचे गठ्ठे हातात घेऊन निघताना व त्याचे मथळे ओरडून सांगणार्या एनडी सरांना तत्कालिक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींची अतिशय जवळून ओळख झाली. वडील व भावाच्या निधनानंतर बहुजन समाजाचा पोशिंदा पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी एनडी सर आणि कुटुंबाला आधार दिला. कर्मवीरांचा सहवास सरांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम करून गेला. महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. सुमारे 18 वर्षे विधान परिषदेत आणि पाच वर्षे विधानसभेत अशी महत्त्वाची 23 वर्षे राजकीय क्षेत्रात राहून सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सरांनी घालवली. याच काळात महाराष्ट्रातील कामगार चळवळीला उर्जितावस्था देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. कर्मवीर अण्णांच्या अखेरच्या काळात त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये सरांना सदस्य करून घ्या, असे पत्र लिहून संस्थेला कळवले होते. त्यांच्या निर्वाणानंतर आठ दिवसांनी सरांना ही घटना कळली. अण्णांनी टाकलेली जबाबदारी त्या दिवसापासून आजतागायत देशनिष्ठा, आत्मियता आणि जिव्हाळ्याने ते बजावत आहेत. मी जो आज कोणी आहे तो केवळ रयत शिक्षण संस्थेमुळे आणि कर्मवीर भाऊरावांमुळे, हे ते नेहमी कृतज्ञतेने सांगतात.
कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, आयटीआय, नापासांची शाळा, सर्व विद्यापीठ संगणक शिक्षण केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कमवा आणि शिका योजना, स्पर्धा परीक्षा केंद्र, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, दुर्बल शाखा विकास, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा गेल्या वर्षी 15 जुलैला 91वा जन्मदिवस साजरा झाला. त्या वेळी महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. पदवी बहाल केली आणि ते एकमेव असे व्यक्तिमत्त्व आहेत. राज्याच्या सामाजिक संघटनांमध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
शिक्षण हे सर्व प्रकारच्या समस्यांचे मूळ असते, असे म्हणतात. सरांनी 1992मध्ये प्रसिद्ध केलेल्या ’शेवटी शिक्षण आहे तरी कोणासाठी’ या पुस्तकामधून सरकारचे आणि समाजाचे डोळे उघडण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी या पदाचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी मिळालेली संधी म्हणून वापर केला आणि शेतकरी, कामगार या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. संपूर्ण कालखंडामध्ये ठरवले असते तर कोणत्याही पदापर्यंत ते पोहोचू शकले असते, मात्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त बहुजन व दुर्लक्षित माणसासाठी काम केले. तत्त्वाशी थोडीशी फारकत घेऊन राजकारणाला साजेशी बाजू घेतली असती, तर कदाचित महाराष्ट्राच्या एक नंबरच्या पदापर्यंत पोहोचू शकले असते, पण तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. सरांनी आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कारकिर्दीला मी वंदन करतो आणि निरोगी दीर्घायुष्य चिंततो, तसेच या सोहळ्याचे संयोजक लोकनेते रामशेठ ठाकूर व सहकार्यांचे आभार मानतो, असे वळसे-पाटील म्हणाले.
उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आपल्या भाषणात म्हणाल्या की, कौटुंबिक अशा या सोहळ्यात आपण मला येण्याची या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेब व आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनापासून आभार मानते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक असो, राजकीय, पत्रकारिता या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आणि निःस्वार्थपणाने समाजाची सेवा करणारी मंडळी व्यासपीठावर उपस्थित असल्याने आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आणि अभिमान आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारसाहेबांची मी भेट घेतली. त्या वेळी साहेबांनी उल्लेख केला की, या कार्यक्रमाला आवर्जून यायचं होतं, पण काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला येता येणार नाही. आपल्या समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सोशल मीडियावर विसंबून उपयोग नाही, तर अशा थोर व्यक्तींचा अभ्यास करून वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. डॉ. पाटीलसाहेबांचा त्याचबरोबर सर्व मान्यवर व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन पुढे काम करीत राहणार, असेही त्या म्हणाल्या.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे कार्य महान आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी केले. विशेषकरून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की, आदरणीय रामशेठ ठाकूर यांनी पनवेल परिसरामध्ये शिक्षण संस्था उभारून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे. त्याबद्दल मी त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर या परिसरात रामशेठ ठाकूर यांना मी जवळून पाहिले आहे. या परिसरात ते राजकारणविरहित समाज घडविण्याचे काम करीत आहेत. स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या नावाने शिक्षणाची गंगा रायगडमध्ये पोहोचविण्याचे आपण जे महान कार्य करता त्या कार्यालादेखील मनःपूर्वक सलाम, तसेच आदरणीय प्रा. डॉ. एन. डी पाटीलसाहेबांचा येथे पुरस्कार देऊन गौरव केला त्यांचेदेखील अभिनंदन करतो.
राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले की, चार वर्षांतून एकदा येणारा 29 फेब्रुवारी हा दिवस आणि त्या 29 फेब्रुवारीला आजचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या मंचावर अजून एक वेगळेपण आहे. ज्यांचा बहुमान करतो त्या पाटीलसाहेबांचे भरीव काम आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व तर आहेच, पण मंचावर उपस्थित त्यांच्या पत्नी पाटीलसाहेबांच्या कर्तृत्वामध्ये झाकोळून गेल्या आहेत. पाटीलसाहेबांना सदैव साथ देणार्या आणि स्वतःचे कर्तृत्व उभे करणार्या आमच्या माईसुद्धा या ठिकाणी आहेत. आजच्या कार्यक्रमात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे पाटीलसाहेब आपल्यासोबत आहेत आणि तरुण पिढीसुद्धा या मंचावर उपस्थित आहे. एका छोट्या गावात जन्म घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपले योगदान दिल्यानंतर आता माझा महाराष्ट्र स्वतंत्र झाला, महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या नवीन महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे महत्त्व गरीब घरापर्यंत पोहोचले पाहिजे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मांडलेले विचार आणि त्यांचा वसा माननीय एन. डी. पाटीलसाहेब आणि त्यानंतर अनिल पाटील, शरद पवारसाहेब या सगळ्यांचा शिक्षणाचा वसा पुढे नेण्याचे काम आमचे रामशेठ ठाकूर करीत आहेत. या अभूतपूर्व सोहळ्यास मला त्यांनी बोलावले. पुढच्या चार वर्षांनी होणार्या सोहळ्यासही मी येईन, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले की, प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांंनी गोरगरीब जनतेसाठी अनेक मोर्चे, आंदोलने केली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची कायम भूमिका ठेवली. त्यामुळे एनडी सर हे विचारांचे पुस्तक समाजाला देण्याचे काम करीत आहेत. त्यांना भगतसाहेबांच्या स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो.
प्रास्ताविकपर भाषणात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आज आपण जनार्दन भगतसाहेबांची 92वी जयंती साजरी करण्याकरिता आणि भगतसाहेबांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरसुद्धा ज्यांनी वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय भरीव कामगिरी केलेली आहे अशा आपल्या लाडक्या प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेबांना भगतसाहेबांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी जमलो आहोत.
जमलेल्या बर्याच लोकांना आणि विशेषकरून पाहुण्यांना जनार्दन भगतसाहेब कोण, हे माहीत नसेल, पण रायगड जिल्ह्याला विशेषकरून पनवेल व उरण तालुक्याच्या दृष्टीने जनार्दन भगतसाहेब आमचे ‘कर्मवीर’. कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी 100 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या व आज शतक महोत्सव साजरा करीत असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे रोपटे प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि. बा. पाटीलसाहेबांच्या मदतीने गव्हाण, जासई, फुंडे, नावडे, वावंजेसारख्या असंख्य ठिकाणी रायगड-कोकणच्या
कडेकपारीत शिक्षणाची गंगा आणून भगतसाहेबांनी लावले. भगतसाहेब आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेब हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म 1928 सालचा, पण भगतसाहेबांचा जन्म 29 फेब्रुवारीला असल्याने त्यांची जयंती दर चार वर्षांनी येते, आज तो सुवर्णदिन आहे.
वयाच्या 14-15व्या वर्षापासून त्यांनी चले जाव चळवळीत भाग घेतला, तर 27-28 वर्षांचे असतानाच बेळगाव-कारवार सीमाप्रश्नासाठी तुरुंगवास भोगला. पनवेल-उरण तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी जनतेसाठी विशेषत: शेतकर्यांसाठी, त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरोधात ते कणखरपणे लढले. न्याय्य हक्क मिळवण्यासाठी सतत संघर्ष करीत राहिले. मोर्चे, आंदोलने करीत स्वतःच्या संसाराकडे, मुलाबाळांकडे पाठ फिरवून सामाजिक कामात रमले. 1960-62 सालापर्यंत पनवेल-उरण तालुक्यात पनवेल, उरण दोन शहरे सोडल्यास कुठेही हायस्कूलच्या शिक्षणाचीही सोय नव्हती. भगतसाहेबांनी कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था या भागात आणली नसती, तर आज आम्ही या भागातील मंडळी स्टेजवर दिसलो नसतो.
आमच्या शालेय जीवनात, तरुणपणात अर्थातच 1960 ते 1990च्या काळातील आमचे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून भगतसाहेब व प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेबांकडे पाहत होतो. अनेक आजार भगतसाहेबांना सतावत असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून माननीय दि. बा. पाटीलसाहेब, प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 1981 व 1984 साली मोठे आंदोलन केले. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला. जासई नाक्यावर पोलिसांच्या लाठीमारात स्वतः रक्तबंबाळ झाले. जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सतत संघर्ष करीत राहिले. त्यामुळे भगतसाहेब वयाच्या 59-60व्या वर्षी 7 मे 1988 रोजी आपल्याला सोडून गेले, पण त्यांनी शेतकर्यांसाठी व प्रकल्पग्रस्तांसाठी लढलेल्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्याचे आणि कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे या भागात लावलेल्या रोपट्यामुळेच पनवेल, उरण तालुक्यात शैक्षणिक क्रांती झाली. त्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही गेल्या पाच दशकांहून अधिक काळ समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी तन-मन-धन अर्पण करून भगतसाहेबांचा वारसा आणि आपला आदर्श सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आपला वारसा आपले समकालीन सहकारी स्व. जनार्दन भगतसाहेबांनी जोपासला. भगतसाहेबांनी आपणाबरोबर पनवेल, उरण तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय चळवळीत हिरिरीने भाग घेऊन आपणास निष्ठेने साथ दिली आणि आपल्या परीने सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यात आपला ठसा उमटवला. त्यामुळेच पनवेल, उरण तालुक्यात कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचे आपण आणलेले रोपटे आज बहरलेले दिसते. रयत शिक्षण संस्था ही आमची मातृसंस्था आणि त्यातून जनार्दन आत्माराम भगत शिक्षण संस्था स्थापून आम्ही त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आज या संस्थेची आठ विद्यासंकुले अतिशय उच्च दर्जाचे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ झपाट्याने होत आहे. विशेषत: आज नवी मुंबईत आधुनिक सर्वसमावेशक अद्यावत व परिपूर्ण शिक्षण देण्याचे कार्य जनार्दन आत्माराम भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधीमधील पदवी, तसेच सीबीएसईसारखे पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंत दर्जेदार शिक्षण देताना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित पुरस्कार या जनार्दन आत्माराम भगत शिक्षण प्रसारक संस्थेने मिळविले आहेत. कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था, आपला आदर्श आणि स्व. भगतसाहेबांची स्मृती जपण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्या नावाने पहिला जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार 2020 प्रदान करताना माननीय प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेब आपल्याशिवाय अन्य मानकरी होऊ शकत नाही, ही जाणीव ठेवून आपल्या कार्याप्रति सलाम करण्याकरिता आपणास हा पुरस्कार देत आहोत आणि महाराष्ट्रातील समाजधुरिणांना स्व. भगतसाहेबांच्या प्रत्येक जयंतीदिनी या पुरस्काराने सन्मानित करण्याचा दृढनिश्चय करून आजपासून या पुरस्काराची सुरुवात केली, असे सांगून या समारंभाला उपस्थित मान्यवर पाहुणे, कार्यकर्ते, पालक, हितचिंतकांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सराव करणारा जलतरणपटू प्रभात कोळी याची नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये सर्वात तरुण जलतरणपटू म्हणून नोंद झाली, तसेच त्याला मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल या सोहळ्यात त्याचा मंत्री दिलीप-वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास जवळपास पाच हजार जणांची उपस्थिती होती. सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतः विशेष लक्ष दिले, तर त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांच्यासह संचालक मंडळ व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.