Breaking News

हम भी है जोश में!

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. सलामीला यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेश व न्यूझीलंडला नमवून साखळीतील चौथ्या व अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचे माफक आव्हान सात विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात भारताचे पारडे जड होते आणि संघाने अपेक्षेप्रमाणे विजय साकारला. खरंतर याआधीचे सामने तगड्या संघांबरोबर झाले. पहिल्याच सामन्यात भारताला गजविजेत्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे होते. पुरुषांप्रमाणे ‘कांगारूं’च्या महिला संघाला त्यांच्याच भूमीत हरविणे सर्वाधिक आव्हानात्मक असते. त्यातच या सामन्यात भारतीय महिलांना 132 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. त्यामुळे ही लढत यजमान संघ लीलया जिंकेल असे वाटत होते, पण हार मानतील त्या भारतीय महिला कसल्या. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला 115 धावांत गारद करून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्या सनसनाटी विजयाची नोंद केली. भारताने त्यानंतर बांगलादेशला नमविले. मग न्यूझीलंडविरुद्धही 133 अशी कमी धावसंख्या असूनही त्यांना 130 धावांत रोखले. ‘किवीं’चा संघ धक्कादायक कामगिरीसाठी ओळखला जातो. लौकिकाप्रमाणे त्यांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि भारताने विजय साकारला. साखळीतील अखेरच्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत श्रीलंकेला 113 धावांवर लगाम घातला. त्यानंतर 15 षटकांमध्येच विजयाला गवसणी घातली.

भारतीय संघ यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधण्यात आला आहे. आतापर्यंत झालेले सामने भारताने गोलंदाजीच्या जोरावर जिंकले आहेत. यामध्ये फिरकी गोलंदाज पूनम यादवने लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चार बळी टिपून हा सामना अक्षरश: खेचून आणला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही तिने तीन विकेट्स घेऊन चमक दाखविली. शिखा पांडेसुद्धा भरात आहे, तर लंकेविरुद्ध राधा यादवने चार जणींना तंबूचा रस्ता दाखवून उपयुक्तता सिद्ध केली. अन्य गोलंदाजांना आपला प्रभाव अद्याप दाखवायचा आहे.

गोलंदाजीत पूनम यादव, तर फलंदाजीत शेफाली वर्मा हिने धडाकेबाज व सातत्यपूर्ण कामगिरी करून डंका निर्माण केला आहे. शेफालीची फलंदाजी पाहिल्यावर टीम इंडियाचा माजी तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागची आठवण येते. वीरूप्रमाणे शेफालीदेखील प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यात ती माहीर आहे. तिने मारलेले षटकार पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. सध्या ती आपल्या खेळीने सर्वांचे मनोरंजन करीत आहे.

साखळीत सर्वच्या सर्व चारही सामने जिंकून अग्रस्थान मिळवित भारताने उपांत्य फेरीतील स्थान भक्कम केले आहे. या फेरीत अन्य संघही तुल्यबळ असणार आहेत. त्यामुळे पुढचा प्रवास खडतर असू शकतो. अशा वेळी केवळ एक-दोघींवर अवलंबून न राहता प्रत्येक खेळाडूला आपले योगदान द्यावे लागेल. भारतीय संघ मग तो विराटच्या नेृत्वावाखालील असो, प्रियम गर्गच्या वा हरमनप्रीत कौरच्या; या सर्व संघांमध्ये प्रतिभा आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या खेळाडूंनी मेहनतीने राष्ट्रीय संघात स्थान मिळविले आहे, परंतु बर्‍याचदा सुरुवातीला धमाकेदार कामगिरी करून नंतर महत्त्वाच्या सामन्यात हे संघ ढेपाळताना दिसतात. नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील वन डे विश्वचषक स्पर्धेतही त्याचा दुर्दैवी प्रत्यय आला. या संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिलेला भारतीय युवा संघ सरतेशेवटी बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला. खेळात हार-जीत होतच असते, पण ज्या पद्धतीन या

स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी झाली होती ती पाहता हाच का तो संघ, असा प्रश्न अंतिम लढतीत पडला. अर्थात बांगलादेशने सर्वांगसुंदर खेळ केला आणि पहिल्यांदा विश्वचषक उंचावला, मात्र त्यानंतर त्यांनी जो उन्माद केला तो सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटसाठी लांच्छनास्पदच होता. याचा त्यांनीच यातून बोध घेतला पाहिजे.

वेस्ट इंडिजमध्ये 2018मध्ये झालेल्या महिलांच्या मागील टी-20 विश्वचषक

स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. त्या वेळी या निर्णायक सामन्यात प्रतिभाशाली फलंदाज मिताली राजला वगळण्यात आले, ज्यामुळे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या पराभवावरून भारतीय संघात वादही निर्माण झाला आणि त्यानंतर प्रशिक्षक रमेश पोवार यांना या पदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुन्हा संधी नाकारली. झाले गेले विसरून या वर्षी संघ नव्या जोमाने ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून, आतापर्यंत चांगला खेळ झाला आहे. आता विश्वचषक फक्त दोन पावले दूर आहे. ते लक्षात घेता सांघिक योगदान आवश्यक आहे. त्यासाठी वूमन्स टीम इंडियाला शुभेच्छा!

-समाधान पाटील

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply